नर्सिंग कॉलेजविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
कॉलेज प्रशासनाकडून नोंदणी क्रमांक दिला जात नसल्याने संताप : नुकसान होत असल्याने निर्णय
बेळगाव : विजया नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी अयोध्यानगर येथील कॉलेजसमोर आंदोलन केले. वारंवार कळवूनही इंडियन नर्सिंग कौन्सिल (आयएनसी) नोंदणी क्रमांक कॉलेज प्रशासनाकडून दिला जात नसल्याने संताप व्यक्त केला. नोंदणी नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. आयएनसी नोंदणी क्रमांक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच नोकरीसाठी इतर देशांमध्ये अर्ज करताना अडथळे येत आहेत. जर नोंदणी क्रमांकच नसेल तर नर्सिंग अभ्यासक्रमाला अर्थ काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. कॉलेज व्यवस्थापनासोबत अनेक वेळा बैठका करून देखील समर्पक उत्तरे मिळत नसल्यानेच बुधवारी आंदोलन करण्यात आले. आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
आयएनसी नोंदणी क्रमांकाचे नूतनीकरण
आंदोलनाची माहिती मिळताच विजया नर्सिंग कॉलेजचे संचालक डॉ. रवी पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की आयएनसी नोंदणी क्रमांकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तो क्रमांक मिळण्यास विलंब होत आहे. येत्या महिन्याभरात नोंदणी क्रमांक मिळेल. व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घेतली असल्याचे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.