For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी बस उलटून विद्यार्थी जागीच ठार

12:03 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
खासगी बस उलटून विद्यार्थी जागीच ठार
Advertisement

26 विद्यार्थी जखमी : होन्नावर तालुक्यातील गीरसप्पा सुळमर्की फाट्याजवळ दुर्घटना

Advertisement

कारवार : खासगी बस उलटून एक विद्यार्थी जागीच ठार तर 26 विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी होन्नावर तालुक्यातील गीरसप्पा सुळमर्की फाट्याजवळ घडली. या बसमधून 50 विद्यार्थी प्रवास करत होते. काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव पवन (वय 15) असे असून, तो दहावीत  शिकत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याचा रविवारीच वाढदिवस होता. याबाबत अधिक माहिती अशी, टी. के. लेआऊट म्हैसूर येथील सरळबाळू शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी खासगी बसमधून गीरसप्पामार्गे कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मुर्डेश्वर, गोकर्णला सहलीसाठी येत होते.

बस होन्नावर तालुक्यातील गीरसप्पा सुळेमर्की फाट्याजवळ आली असता एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. त्यात पवन हा जागीच ठार झाला. तर अन्य 26 विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच होन्नावरचे आणि कुमठा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आणि जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी होन्नावर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असिस्टंट कमिशनर काव्याराणी आणि होन्नावरचे बीईओ विनायक अवधानी यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. होन्नावर पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन पाहणी केली.

Advertisement

अपघाताला राष्ट्रीय हमरस्ता खातेच जबाबदार 

स्थानिकांनी या अपघाताला राष्ट्रीय हमरस्ता खात्याचे अक्षम्य दुर्लक्षच जबाबदार अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे. या अवघड वळणावर यापूर्वीही अपघात होऊन काहीनी जीव गमावला आहे. त्यामुळे या अवघड वळणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्थानिकानी केला आहे. तथापि राष्ट्रीय हमरस्ता खात्याकडून अवघड आणि धोकादायक वळणाबदल अद्यापही ठोस पाऊले उचललेली नाहीत.

Advertisement
Tags :

.