कारवार सी-बर्ड प्रकल्पस्थळी नौदल दिन उत्साहात
कारवार : भारतीय नौदल दिन 2025 सोहळ्याचे औचित्य साधून बिटींग रिट्रीट समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. येथून जवळच्या सी-बर्ड नौदल प्रकल्पातील नेव्ही हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शानदार समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित होते. 1971 मधील भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धाच्यावेळी भारतीय नौदलाने 4 डिसेंबर 1971 रोजी हाती घेतलेल्या ऑपरेशन ट्रायडेट आणि ऑपरेशन पायथनचा भाग म्हणून कराची बंदरावर केलेल्या धाडसी आणि ऐतिहासिक क्षेपणास्त्र युद्धनौकांच्या हल्ल्याचे स्मरण म्हणून प्रत्येक वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. त्या कारवाईमुळे भारतीय नौदलाची कार्यक्षमता आणि कौशल्य अधोरेखीत होते. ते ऑपरेशन म्हणजे भारताच्या सागरी इतिहासातील देदीप्यमान आणि अभिमानास्पद टप्पा मानला जातो.
शिवाय हा सोहळा राष्ट्राचे समुद्रातील सामरिक वर्चस्व घडविणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांच्या शौर्य व्यावसायिकता आणि बलिदानास आदरांजली वाहतो. सूर्यास्ताला साक्ष देऊन नौदल कर्मचाऱ्यांनी बिटींग रीट्रीट समारंभात नेव्ही बॅडने मार्शल (लष्करी) आणि औपचारिक संगीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला कारवार नौदल बंदरात नांगरलेल्या युद्ध नौकांची पार्श्वभूमी लाभली होती. या पार्श्वभूमीमुळे राष्ट्राच्या सागरी हितसंबंधाचे रक्षण करणाऱ्या नौदलाच्या अटळ बांधिलकीचे प्रतिक प्राप्त झाले होते. सी-बर्ड प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या आणि नौदल समुद्रातील कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे भारताची सांस्कृतिक विविधता साजरी झाली. कार्यक्रमाला कर्नाटक नौसेनेचे प्रमुख फ्लॅग कमांडर ऑफीस रियर अॅडमिरल विक्रम मेनन, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीपन एम. एन. आदी अधिकारी उपस्थित होते.