मण्णूर येथील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
उचगाव : आईने अभ्यास कर, असे सांगितल्याने रागावून इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मण्णूर येथे मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी घडली. मनीष वैजनाथ चौगुले असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जोतिबानगर मण्णूर येथील विद्यार्थी मनीष हा बेळगाव येथील कॅम्पमधील मिलिटरी स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी तो शाळेला जाऊन आल्यानंतर सायंकाळी आईने त्याला अभ्यास करण्यास सांगितले. त्यामुळे रागाच्याभरात मनीषने चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने लगेच बेडरूममध्ये जाऊन दरवाजे बंद करून खिडकीला ओढणी बांधून सदर ओढणी पंख्यावरून टाकून गळफास लावून पलंगावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मनीषचे वडील सिक्कीम येथे मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत. घरी आजी, मनीषची आई आणि एक लहान भाऊ असतात. सदर घटनेमुळे मण्णूर गावात एकच खळबळ उडाली आहे.