वाघवडेत विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
शाळेला सुटी असल्याने गेला होता पोहायला
बेळगाव : पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी दुपारी वाघवडे (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. गणेश हिरामणी सुतार (वय 15) राहणार वाघवडे असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नववीत शिकत होता. मंगळवारी दुपारी 3 वाजता आपल्या काही मित्रांसमवेत तो बाहेर गेला होता. रात्री 9 पर्यंत तो घरी परतला नाही. म्हणून कुटुंबीयांनी सर्वत्र त्याचा शोध सुरू केला. रात्री गावाजवळील तलावाच्या काठावर गणेशचे चप्पल, घड्याळ, टी-शर्ट, पँट आढळून आली. त्यामुळे तलावात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गणेश आपल्या काही मित्रांसमवेत पोहायला गेला होता. गणेशचे वडील हिरामणी सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरण नोंदविण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक एल. एस. जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एसडीआरएफ व एचईआरएफच्या मदतीने विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.