For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहाद्दरवाडीतील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

12:23 PM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
बहाद्दरवाडीतील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
Advertisement

नावगे शिवारातील खडी मशीन जवळील पाणी भरलेल्या खड्ड्यात घडली दुर्घटना : गावात हळहळ व्यक्त

Advertisement

वार्ताहर/किणये 

नावगे शिवारातील खडी मशीन जवळील खड्ड्यातील पाण्यात बुडून  बहाद्दरवाडी येथील एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. महादेव हनमंत पाटील (वय 14 रा. बहाद्दरवाडी ) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. या दुर्घटनेचे माहिती गावात सायंकाळी सहाच्या दरम्यान कळाली. 14 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नावगे शिवाराच्या हद्दीत सांबरेकर यांची खडी मशीन आहे. या  खडी मशीन जवळ असलेल्या खड्ड्यातील पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेला असता सदर मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. सदर विद्यार्थ्याचे वडील हनुमंत पाटील व स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की महादेव व त्याचा लहान भाऊ काजूच्या बागेकडे गेले होते. त्यानंतर ते हातपाय धुण्यासाठी सदर खडीमशीनवरील खड्ड्यात असलेल्या पाण्याजवळ गेले. यावेळी महादेव हा खड्ड्यातील पाण्यात पडून बुडाला व त्याचा मृत्यू झाला,असे सांगण्यात आले.

Advertisement

महादेव याची आई आजारी होती. त्यामुळे महादेवचे वडील व आई हे दोघेही बेळगावला दवाखान्याला गेले होते. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान ते घरी आल्यानंतर त्यांना याबाबत माहिती त्यांच्या लहान मुलाने दिली. त्यानंतर गावातील नागरिक व वडील सदर खडीमशीनवरील खड्ड्याजवळ धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला याबाबत गावातील पंचांनी माहिती दिली. त्यानंतर वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस आल्यानंतर बहाद्दरवाडी येथील स्थानिक तऊणांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या महादेवाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात सदर मृतदेह नेण्यात आला आहे. वडगाव ग्रामीण पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. महादेव यांच्या पश्चात वडील, आई व एक लहान भाऊ असा परिवार आहे.

आईने एकच हंबरडा फोडला

महादेवचा पाण्यात बुडून बुडून मृत्यू झाला, हे कळाल्यानंतर घरी त्यांच्या आईने एकच हंबरडा फोडला होता. हे पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले होते.

नुकतीच दिली होती आठवीची परीक्षा

महादेव हा बेळगाव येथील सेंट्रल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. शनिवारीच त्याने आठवीची परीक्षा दिली होती. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तो इयत्ता नववी मध्ये जाणार होता.

प्रश्न सुरक्षेचा..

नावगे शिवारातील हद्दीत दोन ते तीन खडीमशीन आहेत. सदर धोकादायक खड्ड्यापर्यंत कोणीही येणार नाही याची काळजी सदर मालकाने घेतली आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. खडीमशीन जवळील खड्ड्यापर्यंत कोणी येणार नाही यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे का? जर संरक्षण भिंत नसेल तर त्या ठिकाणी एखादा वॉचमन ठेवणे गरजेचे होते. याची चर्चाही घटनास्थळी सुरू होती. आई आजारी असल्याने घरची सर्व कामे महादेवच करायचा महादेव याची आई आजारी आहे. तिला वरचेवर दवाखान्याला न्यावे लागते. त्यामुळे घरातील स्वयंपाक करणे, धुनी, भांडी ही सर्व कामे तो अगदी आनंदाने करत होता. त्यामुळे आई-वडिलांचा आधारही हरपला आहे. महादेव प्रामाणिक मुलगा होता. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.