कारने ठोकरल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
अशोकनगर फूल मार्केटजवळ अपघात
बेळगाव : भरधाव कारने ठोकरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी अशोकनगर येथील फूल मार्केटजवळ ही घटना घडली आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. गौससकलेन फैरोजअहमद हसनवाले (वय 13), राहणार अशोकनगर असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फूल मार्केटसमोरून जात असताना हलग्याहून काकतीकडे जाणाऱ्या भरधाव कारची त्याला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गौससकलेनला खासगी इस्पितळात हलवण्यात आले. थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मेत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुर्दैवी गौससकलेन हा सातवीत शिकत होता. कारचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.