दुर्मीळ नाणी-नोटा प्रदर्शनाला विद्यार्थी-नागरिकांचा प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
दुर्मीळ नाणी व चलनी नोटा पाहण्याची संधी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राममुळे बेळगावच्या नागरिकांना मिळाली आहे. गोवावेस येथील महावीर भवन येथे भरलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या हस्ते झाले. सतराव्या शतकापासून आजतागायतची सर्व नाणी व चलनी नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्यावतीने 28 व 29 डिसेंबर रोजी चलनी नोटा व नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. अरुण कामुले यांनी संग्रहित केलेल्या नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई, बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शैलजा करोशी, इव्हेंट चेअरमन तेजस्विनी गिरीश मुतालिक-देसाई, सिद्धाण्णा वर्मा, लतेश पोरवाल यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
डॉ. सोनवलकर यांनी या उपक्रमाबद्दल अरुण कामुले व रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अभिनंदन केले. ज्यांना चलनी नोटा व नाण्यांविषयी जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शनिवारी दुपारनंतर प्रदर्शन पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती.