सदाशिवनगरातील वाहिन्यांची हेस्कॉमकडून तातडीने दखल
लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या-ऑप्टिक केबलची दुरुस्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी आवाज उठवताच अखेर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना जाग आली. शनिवारी सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे जमिनीलगत आलेल्या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच खासगी दूरसंचार कंपन्यांच्या ऑप्टिक केबलही काढून टाकण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरालगत असलेल्या सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला होता. कोणत्याही अज्ञात वाहनचालकाने वाहन घालून धोका निर्माण होऊ नये यासाठी प्लास्टीकच्या पिशव्या बांधण्यात आल्या होत्या. अनेक वेळा तक्रार करून देखील हेस्कॉम प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नव्हती. तसेच दूरसंचार कंपनीच्या ऑप्टिक केबल देखील लोंबकळत असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
शनिवारी ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच हेस्कॉम प्रशासनाला जाग आली. शनिवारी सकाळी लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढविण्यात आली. तसेच खासगी दूरसंचार कंपनीच्या ऑप्टिक केबलही काढण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे वीजवाहिन्यांची वेळेत दुरुस्ती होऊ शकली.