तिऱ्हाईत टोळक्याकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
गांधीनगरजवळ ट्रक-कार अपघातानंतरची दादागिरी : माळमारुती पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव : भरधाव ट्रकने कारला ठोकरल्यानंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळ शनिवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नसली तरी अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या एका टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. गांधीनगरजवळील हरिकाका कंपाऊंडनजीक शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली असून चौघा जणांच्या एका टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे निपाणी येथील एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. बेळगाव शहर व उपनगरातील चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. ट्रकचालक व कारमधील नागरिकांच्या भांडणात शिष्टाई करण्याच्या निमित्ताने येऊन विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या टोळक्याचा शोध घेण्यात येत आहे. गांधीनगर परिसरात अपघातानंतर वाहनचालक व वाहनातील प्रवाशांवर हल्ल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. श्रीवर्धन (वय 18) रा. निपाणी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या श्रीवर्धनला बीईसाठी हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आपले वडील व त्यांच्या मित्रांबरोबर कारमधून हा तरुण कॉलेज बघण्यासाठी शनिवारी हुबळीला गेला होता.
हुबळीहून परतताना हरिकाका कंपाऊंडजवळ बेळगावच्या दिशेने कार वळवली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टीएन 77 एफ 1490 क्रमांकाच्या भरधाव ट्रकची कारला पाठीमागून धडक बसली. या धडकेनंतर कार आडवी झाली. आडवी कार ट्रकचालकाने फरफटत नेली. कारमधील श्रीवर्धनचे वडील व इतरांनी खाली उतरून ट्रकचालकाला जाब विचारला. ‘तू काय केला आहेस, जरा खाली उतरून बघ’ असे सांगत असतानाच मध्येच शिरलेल्या चौघा जणांच्या एका टोळक्याने श्रीवर्धनच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
महाराष्ट्र पासिंगची कार बघून दादागिरी...
कारला ठोकरलेल्या ट्रकमध्ये फटाक्यांची दारू भरलेली होती.थोडासा जरी अनर्थ घडला असता तर ट्रक व कार दोन्ही जळून खाक झाली असती. मोठा अनर्थ घडला असता. अपघातानंतर ट्रकचालक व कारमधील लोकांची चर्चा सुरू असताना या चर्चेत नाक खुपसण्याची चौकडीची काहीही गरज नव्हती. महाराष्ट्र पासिंगची कार बघून तुम्ही बाहेरचे आहात, आम्ही स्थानिक आहोत, आमच्यावर दादागिरी करता का? अशी विचारणा करीत बापलेकाला बेदम मारहाण केली आहे. अपघातप्रकरणी वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात तर मारहाण प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.