सावंतवाडी मोती तलावात विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
धाडस दाखवित दोघांनी वाचविले विद्यार्थिनीचे प्राण
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी मोती तलावात एका विद्यार्थिनीने उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोरील मोती तलावाकाठी घडली. सुदैवाने दुचाकीवरून जाणाऱ्या सावंतवाडीतील दीपेश शिंदे आणि इव्हिनिंग वॉक करणारे आंबोली येथील सैनिक एकनाथ गावडे यांनी धाडस दाखवत तलावात उडी टाकून विद्यार्थिनीला जीवदान दिले. तिची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक विद्यार्थिनी तलावात उडी टाकल्याचे नागरिकांनी पाहताच दोरी टाकून तिला दोरी पकडायला सांगितली. त्याचवेळी दीपेश शिंदे आणि एकनाथ गावडे यांनी धाव घेत तलावात उडी टाकून तिचे प्राण वाचवले. त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. रुग्णालयात तिचे आई - वडील, नातेवाईक तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सदर विद्यार्थिनी सावंतवाडीतील रहिवासी आहे.