स्टब्ज, झोर्झीने द.आफ्रिकेला सावरले
केशव महाराजचे 7 बळी, पाक प.डाव 333
वृत्तसंस्था / रावळपिंडी
ट्रिस्टन स्टब्ज आणि झोर्झी यांच्या समयोचित अर्धशतकांमुळे येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत द.आफ्रिकेने पहिल्या डावात 4 बाद 185 धावा जमविल्या. तत्पूर्वी पाकचा पहिला डाव 333 धावांवर समाप्त झाला. द.आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने 102 धावांत 7 गडी बाद केले. या मालिकेतील पहिला सामना पाकने जिंकून यापूर्वीच द. आफ्रिकेवर आघाडी मिळविली आहे. पाकने 5 बाद 259 या धावसंख्येवरुन मंगळवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 74 धावांत बाद झाले. द.आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने पाकचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. उपाहारापूर्वीच पाकचा पहिला डाव 113.4 षटकात 333 धावांवर आटोपला. त्यानंतर उपाहारापर्यंत द.आफ्रिकेने पहिल्या डावात 3 षटकात बिनबाद 9 धावा जमविल्या होत्या.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर केशव महाराजने सलमान आगाला पायचीत केले. त्याने आपल्या कालच्या धावसंख्येत 35 धावांची भर घातली. सलमान आगाने 76 चेंडूत 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. केशव महाराजने पाकला आणखी एक धक्का देताना सौद शकीलला मार्करमकरवी झेलबाद केले. त्याने 147 चेंडूत 4 चौकारांसह 66 धावा केल्या. पाकची ही जोडी बाद झाल्यानंतर त्यांचे तळाचे फलंदाज विशेष प्रतिकार करू शकले नाहीत. केशव महाराजने शाहीन आफ्रिदीचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. त्यानंतर केशव महाराजने साजिद खानला 5 धावांवर झेलबाद केले. आसीफ आफ्रिदी हा केशव महाराजचा सातवा बळी ठरला. तो त्रिफळाचीत झाला. त्याने 4 धावा केल्या. केशव महाराजला हार्मेर आणि रबाडा यांची साथ लाभली. हार्मेरने 75 धावांत 2 तर रबाडाने 60 धावांत 1 गडी बाद केला.
द.आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली पण नवव्या षटकात शाहीन आफ्रिदीने रिकेल्टनला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 14 धावा केल्या. कर्णधार मार्करम आणि स्टब्ज यांनी चिवट फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण साजीद खानने कर्णधार मार्करमला शकीलकरवी झेलबाद केले. मार्करमने 62 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. चहापानावेळी द.आफ्रिकेने 34 षटकात 2 बाद 86 धावा जमविल्या होत्या. स्टब्ज 23 तर झोर्झी 13 धावांवर खेळत होते.
शतकी भागिदारी
स्टब्ज आणि झोर्झी या जोडीने द.आफ्रिकेचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 113 धावांची शतकी भागिदारी केली. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात द.आफ्रिकेने आणखी दोन गडी गमविले. आसीफ आफ्रिदीने झोर्झीला पायचीत केले. त्याने 2 षटकार आणि 1 चौकारासह 93 चेंडूत 55 धावा जमविल्या. आसीफ आफ्रिदीने द.आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना ब्रेवीसला खाते उघडण्यापूर्वी आगा सलमानकडे झेल देण्यास भाग पाडले. दिवसअखेर द.आफ्रिकेने पहिल्या डावात 65 षटकात 4 बाद 185 धावा जमविल्या असून अद्याप हा संघ 148 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत. स्टब्जने 149 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक नोंदविले. स्टब्ज 1 षटकार आणि 6 चौकारांसह 68 धावांवर तर व्हेरेनी 10 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे आसिफ आफ्रिदीने 24 धावांत 2 तर शाहीन आफ्रिदी आणि साजीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मात्र नौमन अलीला 21 षटके टाकूनही बळी मिळविता आला नाही.
संक्षिप्त धावफलक: पाक. प. डाव 113.4 षटकात सर्वबाद 333 (शान मसूद 87, सौद शकील 66, अब्दुल्ला शफीक 57, सलमान आगा 45, रिझवान 19, इमामुल हक 17, अवांतर 11, केशव महाराज 7-102, हार्मेर 2-75, रबाडा 1-60), द.आफ्रिका प. डाव 65 षटकात 4 बाद 185 (स्टब्ज खेळत आहे 68, झोर्झी 55, मार्करम 32, रिकेल्टन 14, व्हेरेनी खेळत आहे 10, आसिफ आफ्रिदी 2-24, शाहीन आफ्रिदी व साजीद खान प्रत्येकी 1 बळी).