संघर्ष करणारे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स आज आमनेसामने
वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज गुऊवारी संघर्ष करणारे दोन संघ मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आमनेसामने येणार असून यावेळी सुधारित कामगिरी करण्याचा प्रचंड दबाव मुंबईपेक्षा बेंगळूरवर जास्त असेल. पाच सामन्यांतील चार पराभवांनी मागील आयपीएल लिलावात खेळाडूंना निवडण्याच्या बाबतीत आरसीबीने किती खराब निर्णय घेतले ते दाखवून दिलेले आहे. त्याशिवाय मैदानात चांगले प्रदर्शन करून ती कसर भरून काढण्याची संधीही त्यांनी गमावली आहे.
तथापि, दोन्ही संघांना वेगळे करण्यासारखे फारसे काही नाही. कारण ‘आरसीबी’ ‘मुंबई इंडियन्स’पेक्षा फक्त एका स्थानाने खाली म्हणजे गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत त्यांच्या चार सामन्यांपैकी फक्त एक (दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय) जिंकला आहे. विराट कोहलीने चांगली कामगिरी करूनही बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने त्यांची मोहीम सध्या धोक्यात आली आहे. आयपीएलचा अर्धा टप्पा झपाट्याने पूर्ण होण्याच्या जवळ पोहोच्sात असताना कर्णधार फाफ डू प्लेसिस (109 धावा), ग्लेन मॅक्सवेल (32) आणि कॅमेरॉन ग्रीन (68) या आरसीबीच्या परदेशी स्टार्सना फॉर्म गवसणे अत्यावश्यक आहे.
कोहलीचा फॉर्म जबरदस्त राहिला असून त्याने 146.29 च्या स्ट्राइक रेटने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 316 धावा केल्या आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नोंदविलेल्या 50 व्या एकदिवसीय शतकाच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याने कोहली आज त्याच मैदानावर पुन्हा एक चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक असेल. आरसीबीची गोलंदाजी मैदानावर उतरण्याच्या आधीच कमकुवत दिसली होती आणि मॅक्सवेलचे चार बळी कोणताही दिलासा देऊ शकलेले नाहीत.
परंतु मुंबईविऊद्धची अलीकडील कामगिरी आरसीबीला प्रेरणा देऊ शकते. त्यांनी मुंबईविरुद्दचे मागील पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. परंतु एकंदरित पाहता 32 सामन्यांमध्ये आरसीबीने 14, तर मुंबईने 18 विजयांचा आनंद लुटला आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना करण्यापूर्वी ‘आरसीबी’विरुद्ध आज दुसरा विजय नोंदविता आल्यास मुंबईचा आत्मविश्वास आणखी वाढू शकतो. त्यांच्यासाठीही काही चिंताजनक मुद्दे आहेत. जरी रोहित शर्मा व इशान किशन यांनी डावाच्या सुरुवातीला वेग मिळवून दिलेला असला, तरी मधल्या फळीला गती राखण्यात अपयश आले आहे. त्यास कर्णधार हार्दिक पंड्या मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.
सूर्यकुमार यादवचे पुनरागमन निराश करणारे ठरले असले, तरी तो पुन्हा फार्मात येऊन आपल्या बॅटचे प्रताप दाखविण्यास उत्सुक असेल. रोमॅरियो शेफर्डने नॉर्टजेविऊद्ध एका षटकात 32 धावा फटकावल्याचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध स्पष्टपणे दिसून आला. 235 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना फारसे धोकादायक न दिसूनही दिल्लीने 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले.
संघ : मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.