भुरट्या चोराची डॉन बनण्याची धडपड !
स्वत:ची प्रसिद्धी करायची असेल अथवा दहशत माजवायची असेल तर एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती अथवा संस्थेला टार्गेट करायचे, हा गुन्हेगारीचा नियम आहे. त्यानंतर आपली पाळेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात बळकट कऊन स्वत: या क्षेत्राचा बेताब बादशहा बनायचे. सध्या लॉरेन्स बिश्नोई हा भुरटा चोर याच मार्गाने चालला असून, त्याला डॉन बनल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने, पुन्हा एकदा बॉलिवूड हादऊन गेले आहे. 1990 चा काळ पुन्हा एकदा येतोय की काय? अशी अनेकांना भीती वाटतेय. कारण 90 च्या काळात अंडरवर्ल्ड चरणसीमेवर असताना दाऊदपासुन नुकताच पकडलेला प्रसाद पुजारीपर्यंत अनेकांनी बॉलिवूडमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळोवेळी तो मुंबई पोलिसांनी हाणुन पाडला. आता तर मुंबईत अंडरवर्ल्डचे नामोनिशान मिटले आहे. कुख्यात गुन्हेगार असलेला दाऊद इब्राहीम हा मरणपंथाला लागलाय. तर छोटा राजनने गुन्हेगारी क्षेत्रातून केव्हाची निवृत्ती पत्करत भारत सरकारला शरण आला आहे. चिंधी चोर रवि पुजारीच्या यापूर्वीच मुसक्या आवळल्यात. तर अनेक गँगस्टर मुंबईतील आर्थर रोडमध्ये खितपत पडले आहेत. अंडरवर्ल्ड अगदी खिळखिळं झालंय. मात्र अशातच काही भुरटे चोर अंडरवर्ल्डचा
डॉन बनण्यासाठी धडपड करू लागलेत. यातील एक नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. एका प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला केला किंवा त्याला बदनाम केले तर लवकर प्रसिद्धी मिळते. तसेच दहशत देखील तयार होते. यासाठी छोट्या-मोठ्या चोऱ्या, दरोडे, हत्या तसेच खलिस्तानीवाद्यांना साथ देऊन देखील कोणी दखल घेत नाही. यामुळे पित्त खवळलेल्या लॉरेन्स बिश्नोई नावाच्या भुरट्या चोराने दबंग अभिनेता सलमान खानला टार्गेट केलेय.
सलमान खानला धमकी दिली तर आपण अंडरवर्ल्डमधील उभरता सितारा असू, असा समज या बिश्नोईचा झालाय. यासाठी त्याने गेल्या काही दिवसापासून सलमान खानवर निशाणा साधण्यास सुऊवात केलीय. कधी राजस्थानातील जोधपूरमध्येच मारणार अशी वल्गना लॉरेन्स बिश्नोई या भुरट्या चोराकडून केली जातेय. तर कधी फोन कऊन धमकी दिली जातेय. मात्र याची म्हणावी अशी दखल न घेतल्याने, या भुरट्या चोराने काल-परवा तर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराच्या बाहेर पहाटे-पहाटे गोळीबार केला. एवढेच नाही तर या भुरट्या चोराचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुकवर पोस्ट लिहीत त्या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली. सलमान खान हा दाऊद आणि छोटा शकीलला देव मानतो. असा उल्लेख केला तर जय श्रीरामाचा जयघोष करीत आपण हिंदु डॉन असल्याचे दर्शवित आहे. यापूर्वी देखील असा प्रयत्न छोटा राजनने केला होता. मात्र सध्या तो जेलची हवा खातोय. दाऊद आणि आपल्यात बऱ्यापैकी साम्य असल्याचा समज या लॉरेन्स बिश्नोईचा आहे. दाऊदचे वडील जसे पोलीस दलात होते. अगदी तसेच या लॉरेन्स बिश्नोईचे वडील देखील पोलीस दलात होते. यामुळे दाऊद जसा लहाणपणापासून गुन्हेगारीकडे वळला. तसेच आपण देखील गुन्हेगारीत असल्याने, सध्या डॉन बनण्यासाठी आपण सक्षम असल्याचे या भुरट्या चोराला वाटतंय.
लॉरेन्स बिश्नोईचा इतिहास पाहिला तर यानं अबोहर येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. वडिलांची इच्छा होती की त्याने पोलीस व्हावं. त्यांना त्याला अधिकारी बनवायचं होतं. मात्र लॉरेन्सने स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी आणि स्वत:ची दहशत माजविण्यासाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी, विरोधी गटांशी मारामारी, हवेत गोळीबार करणं असे प्रकार सुरू केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली. तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये तो आयकॉन ठरला होता. यानंतर त्याने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सोशल साइट्सची मदत घेतली. बहुतेक लोक गुन्हे करून लपतात, पण या भुरट्या चोराने गुह्याची नवी कहाणी लिहायला सुरूवात केली. कोणी गुन्हा केला की लगेच तो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल साइटवर अपलोड करत होता. त्याची स्टाईल पाहून तरूणाई प्रभावित होऊ लागली. एकीकडे त्याची गुन्हेगारी पातळी वाढत होती तर दुसरीकडे त्याची फॅन फॉलोइंगही वाढत होती. अनेक तरूण मुलं लॉरेन्सशी त्याच्या सोशल साइट्सच्या अकाऊंटवरून कनेक्ट व्हायला लागली होती. त्याला अगदी मोठा डॉन व्हायचं होतं. दरम्यान, लॉरेन्सनेही आपलं नेटवर्क वाढवण्यास सुरूवात केली होती. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. लॉरेन्सचे विदेशात विशेषत: मलेशिया आणि थायलंडमधील गुंडांशीही संबंध होते. आताही लॉरेन्स तिहार कारागृहातून फक्त विदेशी क्रमांक वापरत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या डीलर्सनी लॉरेन्सच्या सोशल साइट्सच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरूवात केली.
सगळ्यात विशेष म्हणजे लॉरेन्स कधीही समोरच्याला भेटायचा नाही. त्याचं सगळं काम सोशल साईट्सच्या माध्यमातूनच व्हायचं. यामुळे प्रभावित झालेल्या मुलांना त्याच्या नेटवर्कमध्ये जोडण्यास सुरूवात केली. अनेक अल्पवयीन मुलंही त्याच्या टोळीचा भाग आहेत. त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो शाळा कॉलेजच्या मुलांना पिस्तूल आणि गोळ्या द्यायचा आणि लॉरेन्स सांगेल ते काम करायला मुलं तयार व्हायची. पंजाबच नाही तर देशातील अनेक राज्यात जवळपास 700 जण त्याच्या टोळीसाठी काम करीत असल्याचे समोर आलंय. लॉरेन्स मुलांना फक्त व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा फेसबुक मेसेजद्वारे मेसेज द्यायचा. ही आज्ञा कोड वर्ल्डमध्ये देखील असायची.
लॉरेन्सचा आदेश आल्यानंतर ही मुले स्वत: शस्त्र पुरवठादारांना भेटायचे, ते काम करण्यासाठी शस्त्रs घ्यायची आणि काम झाल्यावर शस्त्रs परत करायची. एवढेच नाहीतर लॉरेन्स टोळीने खून, अपहरण, खंडणी अशी कामे सुरू केली होती. सध्या हे सर्व नेटवर्क तो तिहारमध्ये बसून चालवित आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात लॉरेन्सचे नाव थेट कुठेही येत नाही. पोलिसांना सर्व काही माहीत होतं, पण त्यांची इच्छा असूनही ते लॉरेन्सला काही करू शकले नाहीत. या टोळीला सर्व आधुनिक शस्त्रs विदेशातून पुरवली जातात. गायक मुसेवाला याच्या हत्येसाठी सर्व शस्त्रs ही विदेशातून पुरविली होती. कला राणा आणि गोल्डी ब्रार हे लॉरेन्सचे चांगले मित्र आहेत. तसेच खलिस्तानवादी गटाच्या देखील तो संपर्कात असल्याने, याचा तपास एनआयए करीत आहे. गायक सिद्धू मूसेवाला खून खटलाही लॉरेन्स टोळीने चालवला होता आणि लॉरेन्सचा जिवलग मित्र गोल्डी ब्रारनेही याची जबाबदारी घेतली होती. एवढे पाठबळ असल्यानेच या भुरट्या चोराला डॉन बनण्याची स्वप्ने पडू लागली. मात्र याला वेळीच आळा घालणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भविष्यात राज्यात अथवा देशांत पुन्हा शांत झालेला गँगवार सुरू होईल.
- अमोल राऊत