For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हाळ्यात आरओ प्लांटची प्रकर्षाने जाणीव

10:29 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
उन्हाळ्यात आरओ प्लांटची प्रकर्षाने जाणीव
Advertisement

पाणीटंचाई गंभीर : आरओ प्लांट कुचकामी, शुद्ध पाण्याची नितांत आवश्यकता

Advertisement

बेळगाव : नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आरओ प्लांट उभारण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी हे प्लांट बंद स्थितीत आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात आरओ प्लांट कुचकामी ठरताना दिसत आहेत. प्रशासनाने आरओ प्लांटसाठी खर्ची घातलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सोयीच्या ठिकाणी आरओ प्लांट उभारले होते. यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्ची करण्यात आला होता. मात्र आरओ प्लांटकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केवळ शोभेची वस्तू ठरू लागली आहे. शहरात पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. काही ठिकाणी आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत आरओ प्लांटची काहीअंशी मदत झाली असती. मात्र पाण्याविना आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत.

आरओ प्लांट पाण्याविना कुचकामी

Advertisement

शहरासह उपनगरातील काही भागातही आरओ प्लांट उभारले गेले आहेत. मात्र पाण्याविना ते कुचकामी ठरू लागले आहेत. प्रशासनाने उभारलेले हे आरओ प्लांट काय कामाचे असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात आरओ प्लांटची प्रकर्षाने गरज भासू लागली आहे. शहराचा पारा 38 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. सर्वत्र पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्यामुळे मिळेल त्याठिकाणी पाणी आणण्याची वेळ देखील काही नागरिकांना आली आहे. या आरओ प्लांटवर ‘स्वच्छ पाणी घ्या निरोगी रहा’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात स्वच्छ पाणी तर सोडाच साधे पाणी मिळणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तलाव, विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खाली आली आहे. त्यातच शहराला वळिवाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वळिवाची प्रतीक्षा लागली आहे. त्याबरोबर पाणी समस्या कमी करण्यासाठी आरओ प्लांट पूर्ववत आणि सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणीही होऊ लागली आहे.

Advertisement
Tags :

.