For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रसंधी उल्लंघन झाल्यास जोरदार प्रत्युत्तर

06:58 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रसंधी उल्लंघन झाल्यास जोरदार प्रत्युत्तर
Advertisement

भारतीय सैन्यदलाचा पाकिस्तानला इशारा : ऑपरेशन सिंदूरद्वारे लक्ष्य अन् उद्देश साध्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींविषयी विस्तृत माहिती दिली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेत दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आणि 9 दहशतवादी अ•s उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून यात आयसी-814 विमान अपहरणाच्या कटाचे सूत्रधार आणि पुलवामा हल्ल्याचे गुन्हेगारही सामील होते अशी माहिती सैन्याचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच पाकिस्तानच्या विनंतीनुसारच शस्त्रसंधी झाली असून पाकिस्तानने या शस्त्रसंधीचा भविष्यात कधीच उल्लंघन केले तर जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या डीजीएमओशी शनिवारी दुपारी 3.35 वाजता संपर्क झाला होता, त्याच्या परिणामादाखल 10 मे संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी लागू झाली, तसेच 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. परंतु निराशाजनक स्वरुपात पाकिस्तानी सैन्याने केवळ काही तासातच या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तसेच गोळीबार आणि ड्रोन आक्रमण करत आगळीक केली. आम्ही या शस्त्रसंधी उल्लंघनाचे जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच रविवारी सकाळी आमच्याकडून एक हॉटलाइन संदेश पाकिस्तानच्या डीजीएमओंना पाठविण्यात आला, ज्यात पाकिस्तानकडून उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास कठोर प्रतिक्रिया देणार असल्याचे नमूद होते. आमच्या सैन्यप्रमुखाने आमच्या सैन्य कमांडर्सना पाकिस्तानकडून कुठल्याही उल्लंघनाला त्वरित आणि कठोर प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले असल्याचे घई यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सिर अहमद मारला गेला आहे. युसूफ अझहर हा आयसी-814 विमान अपहरणाचा सूत्रधार होता. तर अब्दुल मलिक रौफ हा आयसी-814 अपहरणासह पुलवामा हल्ल्याच्या कटात सामील होता अशी माहिती डीजीएमओंनी दिली आहे. पाकिस्तानी सैन्य आणि वायुदल भारतीय सीमेत दाखल झाले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.

...ते युद्धापेक्षा कमी नाही!

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यानी पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या नुकसानीवर स्थिती स्पष्ट केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये आमचे 5 जवान हुतात्मा झाले आहेत. तर एलओसीवर पाकिस्तानचे 35-40 सैनिक मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य आणि भारतीय सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केले. याचमुळे आम्हाला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागले. 3 दिवसांपर्यंत जे घडले ते युद्धापेक्षा कमी नव्हते. आमचे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत असे घई यांनी सांगितले आहे.

आमचे प्रत्युत्तर संतुलित : भारती

वायुदलाचे डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पत्रकार परिषदेत हवाई हल्ल्यांसंबंधी विस्तृत माहिती दिली. 8 मे रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानी रडार साइट्सना लक्ष्य केले. ही कारवाई आमच्याकडून एक संतुलित प्रत्युत्तर दिले. ज्यानंतरही पाकिस्तानने ड्रोन हल्ले जारी ठेवले, जे आम्ही अपयशी ठरविले. पाकिस्तानी ड्रोन्स अणि अन्य युएव्ही प्रणालींनी एकाचवेळी अनेक भारतीय वायुतळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या आणि त्यांनी सर्व हल्ले हाणून पाडले असल्याचे भारती यानी सांगितले.

कुठलेच नुकसान नाही : भारती

7 मे रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कुठलेच नुकसान झाले नाही, कारण भारतीय हवाई सुरक्षणा यंत्रणा पूर्णपणे सक्रीय आणि सतर्क होती. आमच्या हवाई सुरक्षा सज्जतेमुळे पाकिस्तानी हल्ल्यात कुठलेच नुकसान झाले नाही. आम्ही प्रत्येक संभाव्य धोक्याला वेळीच निष्क्रीय केले. 8 आणि 9 मे रोजी रात्री जवळपास 10.30 वाजल्यापासून पाकिस्तानकडून भारताच्या शहरांच्या दिशेने ड्रोन्स, युएव्ही आणि युसीएव्ही सोडण्यात आले, तर 7 मे रोजी युएव्ही पाठविण्यात आले, तर 8 मे रोजी या पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते, परंतु याचा उद्देश टेहळणी आणि नागरिकांना घाबरविणे होता. भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या हा हेतू यशस्वी होऊ दिला नसल्याचे भारती यांनी म्हटले आहे.

बहावलपूरमध्ये दहशतवादी तळ नष्ट

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बहावलपूर येथील दहशतवादी अ•dयावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला करत तो पूर्णपणे नष्ट केला असल्याचे सांगत भारतीय वायुदलाचे डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी या हल्ल्याची ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज सादर पेले, ज्यात बहावलपूर येथील मोठी हानी स्पष्टपणे दिसून येते. वायुदलाने पाकिस्तानच्या मुरिदके येथील दहशतवादी अ•dयालाही अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे सांगत तेथील उपग्रहीय छायाचित्रे सादर केली आहेत.

शत्रूच्या तळावर वार करणे लक्ष्य

भारताचा उद्देश शत्रूला चोख प्रत्युत्तर देणे होते, शत्रूच्या भूभागातील मृतदेह मोजणे नव्हता. आम्ही जी पद्धत अन् साधने निवडली, त्याचा शत्रूवर अपेक्षित प्रभाव पडला आहे. किती मारले गेले, किती जखमी झाले हे मोजत बसणे आमचे काम नाही. आमचे लक्ष्य शत्रूच्या तळांवर निशाणा साधणे होते, दहशतवादाशी संबंधित तळांना लक्ष्य करणे हाच भारताचा उद्देश होता असे भारती यांनी स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानची एअरबेस कमांड सिस्टीम, मिलिट्री एअरबेसला लक्ष्य केले. चकलाला, रफीकी, रहयार खान तळाला लक्ष्य करत पाकिस्तानला धडा शिकविण्यात आला. पाकिस्तानच्या प्रत्येक तळावरील सिस्टीमला लक्ष्य करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. शत्रूने यापुढे तणाव वाढविण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची इच्छा असल्याचे भारती यांनी म्हटले आहे.

कराची देखील होते टार्गेटवर

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची कॅरियर बॅटल ग्रूप, पृष्ठभागावरून लढणाऱ्या युनिट्स, पाणबुड्या आणि नौदलाची विमाने युद्धाच्या पूर्ण तयारीसह समुद्रात तैनात करण्यात आल्या होत्या. दहशतवादी हल्ल्याच्या 96 तासांच्या आत अरबी समुद्रात अनेक शस्त्रास्त्र परीक्षणांदरम्यान आम्ही आमची रणनीति आणि संचालन प्रक्रियांना पडताळून पाहिले आणि त्यात सुधारणा केल्या. भारतीय नौदलाच्या शक्तिशाली उपस्थितीमुळे पाकिस्तानला त्याचे नौदल आणि वायुदलाला बंदर तसेच किनारी भागांपर्यंत मर्यादित ठेवण्यास भाग पडले. आमची प्रत्युत्तरादाखलची कारवाई संयमी, संतुलित आणि जबाबदारपूर्ण होती. गरज भासल्यास हल्ला करता येईल अशा ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी आम्ही करून ठेवली होती. भारतीय नौदल अद्याप समुद्रात पूर्ण शक्तिनिशी ठाण मांडून कुठल्याही शत्रुत्वपूर्ण कृत्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास तयार आहे असे भारतीय नौदलाचे डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी पाकिस्तानचे कराची बंदर देखील टार्गेटवर होते असे वक्तव्य केले.

पाकिस्तानचे हल्ल्याचे सर्व प्रयत्न उधळले

पाकिस्तानने मागील काही दिवसांमध्ये भारतीय सैन्यतळ अन् नागरी वस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, यातील बहुतांश प्रयत्न हाणून पाडण्यात आले. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अनेक सैन्यतळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने हे सर्व धोके नष्ट केले असल्याचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.