इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर, रुट-ब्रुकची नाबाद शतके
पाकविरुद्ध पहिली कसोटी, तिसरा दिवस : इंग्लंडच्या 3 बाद 492 धावा
मुलतान (पाकिस्तान)
मुलतान येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने यजमान पाकिस्तानला जोरदार धक्का दिला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात शान मसूद, अब्दुल्ला शफीक आणि आगा सलमान यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 556 धावा केल्या. प्रत्युत्तरात तीन दिवसांचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 101 षटकांत 3 बाद 492 धावा केल्या आहेत. जो रुट 176 आणि हॅरी ब्रूक 141 धावांवर नाबाद परतले. विशेष म्हणजे, दिग्गज फलंदाज जो रुटने 35 वे कसोटी शतक झळकावत बड्या बड्या फलंदाजांना मागे टाकले आहे. नाबाद शतकी खेळीसह रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावे केला. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
मुलतानच्या पाटा खेळपट्टीवर पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 556 धावा केल्या. यानंतर इंग्लंडनेही जोरदार सुरुवात करताना दुसऱ्या दिवशी 1 बाद 96 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण, अर्धशतकवीर जॅक क्रॉलीला 78 धावांवर शाहिन शाह आफ्रिदीने बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. यानंतर अनुभवी जो रुट व बेन डकेट यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी साकारत संघाला पावणेतीनशेचा टप्पा गाठून दिला. डकेटने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 75 चेंडूत 11 चौकारासह 84 धावा केल्या.
रुट, ब्रुकची नाबाद शतके
आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डकेटला अमीर जमालने बाद करत पाकला यश मिळवून दिले. मुलतानच्या या पाटा खेळपट्टीवर इंग्लंडने वनडेसारखी फलंदाजी करताना पाक गोलंदाजांना चांगलेच झोडपले. डकेट बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक आणि जो रु यांच्यात चौथ्या विकेटसाठी 310 चेंडूत 243 धावांची भागीदारी झाली. पाकिस्तानमध्ये कोणत्याही विकेटसाठी इंग्लंडची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ब्रूकने 173 चेंडूत 12 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 141 धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक झळकावले. रुटने देखील कसोटीतील 35 वे शतक झळकावताना 12 चौकारासह नाबाद 176 धावा केल्या. ब्रुक व रुटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेरीस 101 षटकांत 3 बाद 492 धावा केल्या आहेत. अद्याप ते 64 धावांनी पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद 556
इंग्लंड पहिला डाव 101 षटकांत 3 बाद 492 (जॅकी क्रॉली 78, बेन डकेट 84, जो रुट खेळत आहे 176, हॅरी ब्रुक खेळत आहे 141, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह व अमीर जमाल प्रत्येकी एक बळी).
विक्रमवीर जो रुट, इंग्लंडकडून सर्वाधिक धावा व शतकांचा विक्रम
जो रुट आता इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम अॅलिस्टर कुकच्या नावावर होता. आता रूट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुकने कसोटीमध्ये 161 सामन्यात 12472 धावा केल्या. पाकविरुद्ध पहिल्या कसोटीत रुटने नाबाद शतकी खेळी करत हा कुकला मागे टाकले आहे. रुटने आतापर्यंत 147 कसोटी सामन्यांच्या 268 डावांमध्ये 12473 हून अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर (भारत) - 15,921
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 13,378
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 13, 289
राहुल द्रविड (भारत) - 13,288
जो रूट (इंग्लंड) - 12,473
पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीत जो रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक साजरे केले. या शतकी खेळीसह रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. तसेच रूट सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये सहावा स्थानी पोहोचला आहे. एका शतकासह त्याने जगातील चार मोठ्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. यामध्ये सुनील गावसकर, वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा, श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने आणि पाकिस्तानच्या युनूस खान यांना मागे टाकलं आहे. या चारही दिग्गजांनी 34 शतके केली असून आता रूट त्यांच्या पुढे निघून गेला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू
- सचिन तेंडुलकर (भारत) - 51 शतके
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 45 शतके
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 41 शतके
- कुमार संगकारा (श्रीलंका) - 38 शतके
- राहुल द्रविड (भारत) - 36 शतके
- जो रूट (इंग्लंड) - 35 शतके