For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारमध्ये काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने

10:16 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवारमध्ये काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने
Advertisement

कारवार : म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या कथित बेकायदा भूखंड वाटपप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी खटला चालविण्यास परवानगी दिली आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी येथे काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मित्रसमाज मैदानावर काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले. तेथून सुभाष सर्कल, सविता सर्कल, हंजा नाईक रोड, पीकळे रोडवरुन निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपाल गेहलोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री कुमारस्वामी व केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

Advertisement

गेहलोत हे बेजबाबदार राज्यपाल!

राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे म्हणाले, राज्यपाल गेहलोत हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार वागत आहेत. ते केंद्राच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांच्यासारखे बेजबाबदार राज्यपाल आपण आपल्या राजकीय जीवनात पाहिले नाही, असे ते म्हणाले.

Advertisement

सिद्धरामय्या यांचे लोकाभिमुख कार्य भाजपला पाहवत नाही

जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य म्हणाले, भाजपचे ऐकून राज्यपाल गेहलोत यांनी राज्यपालपदाची गौरव धुळीस मिळविला आहे. राज्यातील जनतेने  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आणि भाजपचे कार्य अनुभवले आहे. सिद्धरामय्या यांच्याकडून केले जाणारे लोकाभिमुख कार्य भाजपला पाहवत नाही. केंद्र सरकारचे बाहुले बनून राहिलेल्या राज्यपाल गेहलोत यांना सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवायचे आहे. राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा विडा राज्यपालांनी उचलला, असा आरोप करुन मंकाळू वैद्य यांनी राज्यपालांच्या विरोधात संताप व्यक्त केला तसेच राज्यपालांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.

Advertisement
Tags :

.