For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गटबाजीचा तिढा सुटला...

11:13 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गटबाजीचा तिढा सुटला
Advertisement

समन्वयाने काम करण्याची राज्य भाजप नेत्यांना सूचना : रा. स्व. संघाच्या प्रयत्नांना यश

Advertisement

बेंगळूर : भाजप नेते आणि रा. स्व. संघाची प्रलंबित बैठक गुरुवारी बेंगळूरमध्ये पार पडली. राज्य भाजप नेतृत्त्वाविषयी असंतुष्ट असणाऱ्या आमदारांना बैठकीत पक्षसंघटना आणि समन्वय राखून काम करण्याची सूचना देण्यात आली. पक्षांतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीचा तिढा सोडविण्यात संघ नेत्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समजते. भाजप प्रदेशाध्यपदी बी. वाय. विजयेंद्र यांची नेमणूक झाल्यानंतर काही आमदार नाराज होते. वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारविरोधात काढलेल्या बेंगळूर-म्हैसूर पदयात्रेपासून अनेक आमदार दूर राहिले. विजयेंद्र यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही,  से सांगून वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडलसंगमपासून बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे असंतुष्ट गटातील नेत्यांनी सांगितले होते. यामुळे राज्य भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

अखेर रा. स्व. संघ नेत्यांनी हस्तक्षेप करून राज्य भाजपमधील अंतर्गत नाराजी, समन्वयतेचा अभाव दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते यशस्वीही ठरल्याचे समजते. राज्य नेतृत्त्वावर नाराज असणाऱ्यांशी चर्चा करून समजूत काढण्यात आली आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे पक्षासाठी काम करावे, अशी सूचना भाजप नेतृत्त्व आणि त्याविरुद्ध असणाऱ्या गटाला देण्यात आली आहे. पक्ष म्हटले तर त्यात मतभेद आलेच. मात्र, हाच मुद्दा मनात ठेवून एकमेकांवर कुरघोडी केल्यास पक्षाची हानी होईल. त्यामुळे यापुढे कोणीही एकतर्फी निर्णय घेऊ नये. पक्षाच्या निर्णयाशी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, राज्य कार्यकारिणीच्या पुनर्रचनेविषयी बसून चर्चा झाली पाहिजे, राज्य सरकारविरोधात संघटितपणे आंदोलन करावे, यासाठी आणखी एक पदयात्रा पक्षाच्या व्यासपीठावर व्हावी, पक्षातील अंतर्गत मुद्दे उघडपणे मांडू नयेत, पक्ष संघटना आणखी मजबूत करावी, कार्यकाळ संपलेल्या मंडल आणि जिल्हा पक्षाध्यक्षांना बदलण्यात यावे, सदस्यत्व नोंदणी अभियानाला गती प्राप्त झाली पाहिजे, असे सल्लेही बैठकीत संघ नेत्यांनी दिले. रा. स्व. संघ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार बसवनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, माजी मंत्री अरविंद लिंबावळी, माजी खासदार प्रतापसिंह, माजी प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील आदी सहभागी झाले होते.

Advertisement

बळ्ळारीपर्यंत पदयात्रेला संमती; पण...

वाल्मिकी विकास निगमच्या गैरव्यवहाराविरुद्धच्या लढ्यासाठी पक्षाच्या व्यासपीठावर बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. यावर ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी यांनी देखील संमती दर्शविली. इतके दिवस दोन-तीन स्वतंत्र बैठका घेतलेल्या आमदारांनी आता पुढील वाटचालीची सूत्रे माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांच्या हाती सोपविली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेत्यांनी सर्व मुद्द्यांवर मुक्तपणे चर्चा झाल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.