आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात जोरदार निदर्शने
कारवारसह तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण : एकलपाटी यांना त्वरित कारवारातून हद्दपार करण्याची मागणी
कारवार ; दलित रक्षण मंचचे जिल्हाध्यक्ष आणि येथून जवळच्या शिरवाड येथील सिव्हिल ठेकेदार एलीसा एकलपाटी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, वेगवेगळ्या हिंदू देवता आणि वाल्मिकी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील टीप्पणींचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर कारवारसह तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण बनून राहिले होते. व्हिडीओद्वारे अनेकांच्या भावना दुखावलेल्या आणि सामाजिक स्वास्थ बिघडविण्यास कारणीभूत ठरलेल्या एकलपाटी यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांना कारवारातून हद्दपार करावे, या मागणीसाठी पक्षभेद विसरून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि बृहत निषेध मोर्चाद्वारे जोरदार निदर्शने करण्यात आली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अन्य राज्यातील एकलपाटी व्यवसायाच्या निमित्ताने येथून जवळच्या शिरवाड येथे वास्तव्य करून आहेत. हिंदू धर्माचा त्याग करून अन्य धर्मात प्रवेश केलेल्या एकलपाटी यांनी अनुसूचित जमातीसाठी असलेल्या सरकारी सुविधांचा लाभ उठवीत आहेत. व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी दलितांसाठी काम करण्यास सुरुवात केली. 18 ऑगस्ट रोजी ते दलित रक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी गोकर्णला गेले आणि परत येत असताना वाहनात मित्राशी बोलताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, हिंदू देवता शंकर, राम, हनुमान, सरस्वती, ब्रम्हदेव, विष्णू, नागदेवता आणि वाल्मिकी समाजाबद्दल अतिशय आक्षेपार्ह अश्लील आणि घाणेरड्या शब्दात वक्तव्य केले. इतकेच नव्हेतर या सर्वाबद्दल आक्षेपार्ह हावभाव केले. पुढे एकलपाटी यांनी त्या मित्राला हिंदू धर्माचा त्याग करून अन्य धर्मात प्रवेश करण्याची गळ घातली. एकलपाटी आणि मित्रा दरम्यान झालेल्या बोलणीचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर पहिल्यांदा शिरवाड येथील महिलांनी एकलपाटी यांच्या विरोधात निदर्शने केली. हा व्हीडीओ हिंदू कार्याकर्त्यांच्या हाती लागताच कारवारसह तालुक्यात संतापाची लाट पसरली. हिंदू कार्यकर्त्यांनी येथील सुभाष सर्कलजवळ जमा होऊन टायर पेटवून दिले आणि एकलपाटी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
12 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी...
दरम्यान, या प्रकरणाची नोंद कारवार ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी एलिसा एकलपाटी यांना ताब्यात घेऊन न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्यांना सप्टेंबर 12 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जोरदार निदर्शने-मोर्चा...
एकलपाटी यांच्या विरोधात आज शुक्रवारी येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षभेद विसरून मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही मोठा होता. सुभाष सर्कलपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, हर हर महादेव, पवनपुत्र हनुमान की जय, हिंदू धर्मांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी एकलपाटी यांच्या विरोधातही जोरदार घोषणा देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. तथापी एकलपाटी यांना जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाही. तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असे सांगण्यात आले.