अमेरिकेत मुनीरविरोधात जोरदार निदर्शने
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
पाकिस्तानचे वादग्रस्त फील्ड मार्शल आणि त्या देशाचे सेनाप्रमुख सय्यद असीम मुनीर यांचे अमेरिकेत जोरदार निर्दशनांनी स्वागत करण्यात आले आहे. ते रविवारी अमेरिकेच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली. ‘शेम ऑन यू, मास मर्डरर’ अशा निषेधाच्या घोषणा त्यांच्या विरोधात निदर्शकांनी दिल्या. लोकांनी मुनीर यांची निंदा आणि निर्भर्त्सना करणारे पोस्टर्सही हाती धरले होते. ही निदर्शने अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाच्या नागरीकांनीच केली आहेत, ही विशेष बाब म्हणून मानली जात आहे.
गेल्या शनिवारी अमेरिकेत अमेरिकेच्या सेनेचा 250 वा स्थापना दिवस भव्यपणे साजरा करण्यात आला. या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मुनीर यांना आमंत्रित करण्यात आले होते, अशी अफवा पसरविण्यात आली होती. जगभर परसलेली ही अफवा खरी मानून भारतातील विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ज्या मुनीर यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्या भारतविरोधी मुनीर यांना अमेरिकेने आपल्या सेनादिनाचे प्रमुख अतिथीपद दिले, हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा दारुण पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली होती. तथापि, नंतर अमेरिकेने मुनीर किंवा कोणत्याही देशाच्या सेनाप्रमुखांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण दिल्याने भारतात विरोधी पक्षांची मोठी गोची झालेली दिसून आली.
पाच दिवसांचा दौरा
अमेरिकेच्या सेनेचा स्थापना दिवस साजरा झाल्यानंतर मुनीर रविवारी अमेरिकेत दौऱ्यासाठी पोहचले आहेत. त्यांचा दौरा पाच दिवसांचा आहे. या दौऱ्यात ते अमेरिकेच्या सेनाधिकाऱ्यांना भेटणार असून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी सहकार्याच्या संदर्भात बोलणी करणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
मार खाल्लेल्या देशाचे फिल्ड मार्शल
22 एप्रिलला पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला करुन हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ठार करण्याचे घृणित कृत्य केले होते. त्याचा प्रतिशोध भारताने 7 मे या दिवशी मध्यरात्री पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करुन घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भारताने हाणून पडला. तसेच पाकिस्तानमधील 19 वायुतळांवर आणि अनेक लष्करी आस्थापने, तसेच रडार यंत्रणांवर हल्ले करुन त्यांचा चुराडा केला होता. तथापि, एवढा जबर मार खाऊनही पाकिस्तानने सेनाप्रमुख असलेल्या मुनीर यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद दिले होते. त्यामुळे मुनीर यांचा ‘मार खाल्लेल्या देशाचे फील्ड मार्शल’ असा उपहासगर्भ उल्लेख जगभर करण्यात येत आहे. अशा मुनीर यांना अमेरिकेच्या सेनादिनाचे अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची अफवा बहुधा पाकिस्तानातूनच पसरविली गेली असावी, असे अनुमान आहे.