Karad News : कर्नल संभाजी पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते ऐतिहासिक तैलचित्र सन्मान
कलात्मक सन्मान, कर्नल संभाजी पाटील यांचा गौरव
कराड : जामनगर (राजस्थान) येथे १९८८ साली महामहीम राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या स्वागतावेळी स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या कर्नल संभाजी पाटील यांच्या ऐतिहासिक क्षणाचे ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांनी साकारलेले तैलचित्र खासदार शरद पवार यांच्या हस्ते संभाजी पाटील यांना प्रदान केले.
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी चित्रकार दादासाहेब सुतारयांच्या कलाकृतीचे कौतुक करत 'इतिहास जिवंत करणारी ही कलाकृती स्तुत्य आहे' असे अभिनंदन केले.
या सोहळ्यास प्रा. भगवान खोत व चित्रकार भाग्यश्री सुतार यांची उपस्थिती होती. माजी संरक्षणमंत्री असलेल्या पवार साहेबांच्या हस्ते झालेला तैलचित्र प्रदान सोहळा कर्नल संभाजी पाटील यांच्या सेवाभिमानाचा गौरव करणारा ठरला.
दरम्यान, सुतार यांनी साकारलेली ही कलाकृती केवळ सैनिकी इतिहासाची आठवण नव्हे तर भारतीय कला, संस्कृतीच्या जतनाला हातभार लावणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.