For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनू राणी, ज्योती येराजी यांची दमदार कामगिरी

06:33 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनू राणी  ज्योती येराजी यांची दमदार कामगिरी
Advertisement

वृत्तसंस्था/ वॉरसॉ (पोलंड)

Advertisement

येथे सुरु असलेल्या वॉरझेवेस्कि झेओदी लिको 2024 च्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे अॅथलिटस अनू राणी तसेच ज्योती येराजी आणि राजेश रमेश यांनी विविध क्रीडा प्रकारात शानदार कामगिरी केली. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीची ही सरावाची अॅथलेटिक्स स्पर्धा आहे.

महिलांच्या भालाफेक प्रकारात आशियाई स्पर्धेतील विद्यमान विजेती अनू राणीने शनिवारी या स्पर्धेत प्रथम स्थान मिळविताना 58.70 मी. ची नोंद केली. 31 वर्षीय अनू राणीने पाचव्या प्रयत्नात ही कामगिरी करताना पोलंडच्या अॅमेलिया बिलेकला मागे टाकले. बिलेकने या क्रीडा प्रकारात 35.35 मी. ची नोंद केली. अनू राणी हिने 8 वेळेला महिलांच्या भालाफेक प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले असून तिने 2022 च्या इंडियन खूल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत 63.82 मी. चा भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. दोन महिन्यांपूर्वी जर्मनीत झालेल्या स्पर्धेत अनूने या क्रीडा प्रकारात 60.68 मी. ची सर्वोत्तम नोंद केली होती. या क्रीडा प्रकारात कोलंबियाच्या फ्लोर रुईझने 66.70 मी. चा विश्वविक्रम नोंदविला आहे. हा विश्वविक्रम मागे टाकण्यासाठी अनू राणीचे जोरदार प्रयत्न सरु आहेत.

Advertisement

महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत भारताची धावपटू ज्योती येराजीने पात्र फेरी अखेर आघाडीचे स्थान मिळविताना 13.29 सेकंदाचा अवधी घेतला. पण ती अंतिम फेरीत सहभागी झाली नाही. गेल्या मे महिन्यात ज्योती येराजेने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीमध्ये 12.78 सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. वॉरसॉच्या या स्पर्धेत ज्योतीने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत आपला सहभाग दर्शवित 23.53 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या किरण पेहलने 23.33 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान घेतले. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताचा धावपटू 25 वर्षीय राजेश रमेशने चालू वर्षीच्या अॅथलेटिक हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करताना 45.54 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात भारताचा धावपटू मोहम्मद अझमलने 45.69 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीतील राष्ट्रीय विजेत्या मोहम्मद अनास याहियाने चौथे स्थान पटकाविले. महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या ज्योतीका श्रीदंडीने 52.32 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले. वॉरसॉ अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झालेले सर्व भारतीय अॅथलिटस् आता 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारतीय अॅथलिटिक्स चमूला पोलंडच्या ऑलिम्पिक क्रीडा संकुलात खास प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी 29 सदस्यांचा भारतीय अॅथलेटिक्स संघ निवडण्यात आला असून त्यामध्ये विश्व चॅम्पियन निरज चोप्राचा समावेश आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघातील खेळाडू 28 जुलैला पॅरिसमध्ये एकत्र येतील. तसेच या स्पर्धेत अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकाराला 1 ऑगस्टपासून प्रारंभ होईल.

Advertisement
Tags :

.