अलमट्टीच्या उंचीवाढीला तीव्र विरोध
सांगली / रावसाहेब हजारे :
दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर सांगली, कोल्हापूरकरांच्या अलमट्टी धरणातील साठ्याकडे नजरा लागतात. पुर्वानुभवामुळे अलमट्टी धरणातील फुगवटा सांगली, कोल्हापूरच्या महापुराचे प्रमुख कारण असल्याचे आरोप सुरू आहे. अशातच अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटकने घेतल्याने गेल्या वर्षभरापासून सांगली, कोल्हापूरकर धास्तावले आहेत. उंचीवाढीला विरोध करण्यासाठी आजपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनाचे फलित म्हणून आज सर्वपक्षीयांची दिल्लीत बैठक होत आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याबरोबर सोमवारी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. त्यांच्या बैठकीचे रितसर निमंत्रण सांगली आणि कोल्हापूरमधील सत्ताधारी तसेच विरोधी लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीआधी महाराष्ट्र सदनमध्ये सांगली व कोल्हापूर मधील लोकप्रतिनिधी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत अलमट्टीच्या उंचीवाढीचा विरोध शास्त्रीयदृष्ट्या नोंदवण्याच्या संदर्भात रणनिती ठरवण्यात येणार आहे.
- कर्नाटकच्या प्रस्तावास महाराष्ट्र सरकारचा विरोध पण...
कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची ५१९.६० वरून ५२४.२५६ मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला होता. २००५ व २००६ मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती केली. यामध्ये धरणाची उंची वाढवल्यास त्याचा महाराष्ट्र हद्दीत काहीही परिणाम होणार नाही, असा अहवाल काही समित्यांनी दिला आहे. याच अहवालांचा आधार घेत कर्नाटकने धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लवादाने या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने २०१३ मध्येच कर्नाटकला अलमट्टीची उंची वाढवण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नंदकुमार वठणेरे समितीने दिलेल्या अहवालातील दहा शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. पाच अंशतः आणि एक सुधारणेसह स्वीकारली आहे. अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवल्यास या धरणातील फुगवटा कर्नाटक हद्दीत २२१ किमीच्या पुढे जात नाही. हे धरण महाराष्ट्र हद्दीपासून २३५ किमी असल्याने उंचीवाढीचा परिणाम ठोस समजण्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता त्यांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे
फेर अभ्यासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रूरकी येथील शास्त्रज्ञांच्या समितीचा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. परंतु त्यापुर्वीच कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्नाटकला या निर्णयापासून रोखण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात आंदोलने सुरू झाली आहेत. रास्तारोको बरोबरच न्यायालयानी लढयाची तयारी सुरू आहे.
राज्य सरकार याविरोधात काहीच हालचाल करत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना नुकतेच पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवणे म्हणजे सांगली व कोल्हापूर जिल्हयाच्या अडचणीत वाढ करण्यासारखे असल्याने कर्नाटकला परवानगी देऊ नये, अशी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे दोन्ही जिल्हयांच्या नदीकाठच्या गावांच्या नजरा लागल्या आहेत.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटकच्या निर्णयानंतर सांगलीचे खा. विशाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती विभागाने धक्कादायक उत्तर दिले होते. अलमट्टीच्या उंची वाढविण्याच्या निर्णयाविरोधात कृष्णा खोऱ्यातील एकाही राज्याने आक्षेप नोंदविला नाही, असा खुलासा केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी केला होता.
आज होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकचेही अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी सांगली आणि कोल्हापूर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनीही तांत्रिक आणि वैज्ञानिक अभ्यासाअंती अलमट्टीच्या उंचीला विरोध करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या बैठकीत होणारी चर्चा आणि निर्णयावर अलमट्टीच्या उंची वाढीचे भवितव्य अवलंबून आहे.
- कृष्णा खोरे आणि अलमट्टी उंची वाढीचा असा आहे
विषय कृष्णा ही आंतरराज्य नदी असून ती महाराष्ट्र, कर्नाटक तेलंगणा व आंध्रप्रदेशातून वाहते. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
कृष्णा नदीच्या एकुण १४०० किमी लांबीपैकी तिचा महाराष्ट्रातील प्रवास २८२ कि. मी. आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत कृष्णेला कोयना, पंचगंगा, दुधगंगा व वारणा या महत्वाच्या उपनद्या मिळतात.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागापासून २३५ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणाची पूर्ण संचय पातळी ५१९.६० मी. असून प्रकल्पीय साठा १२३.०० अघफू. आहे. अलमट्टी धरणात २००५ साली प्रथमच पूर्ण संचय पातळीपर्यत पाणी साठवले होते. कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सन २०१० मध्ये जाहीर केलेल्या 'द रिपोर्ट ऑफ दि कृष्णा वॉटर डिस्पूटस ट्रिब्युनल वुईथ द डिसिजन खंड -१' अहवालानुसार कर्नाटक राज्यास अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१९.६० मी. इतकी ठेवून १२३.०० अ.घ.फु. पाणी साठ्याची परवानगी दिली होती.
- उंचीवाढीस २०१३ मध्येच परवानगी
या धरणाची उंची ५२४.२५६ मी. पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्र शासनास सादर केला होता. उंचीवाढीनंतर २२३.०० अ. घ. फु. इतका पाणीसाठा होणार आहे. २००५-२००६ मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने या प्रस्तावास विरोध केला होता. त्यामुळे केंद्र व राज्य शासनामार्फत तांत्रिक समित्यांच्या माध्यमातून अभ्यास केला गेला. अभ्यासाअंती अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचा महाराष्ट्रच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही, असा अहवाल अभ्यास समित्यांनी सादर केला.
कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सन २०१३ मध्ये जाहीर केलेल्या 'द रिपोर्ट ऑफ दि कृष्णा वॉटर डिस्यूटस ट्रिब्युनल वुईथ द डिसिजन खंड-२' अहवालानुसार कर्नाटकला अलमट्टी धरणाची उंची ५२४.६० मी. पर्यंत वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारच्या बैठकीत अलमट्टीच्या उंची वाढीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयावर दरवर्षी घोंगावणाऱ्या महापुराच्या संकटावर तोडगा निघणार का याकडे दोन्ही जिल्हयातील पूरग्रस्तांचे लक्ष आहे