कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला पंजाबमध्ये तीव्र विरोध
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून बंदीची मागणी, थिएटरबाहेर ‘एसजीपीसी’ची निदर्शने
वृत्तसंस्था/ अमृतसर
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार कंगना राणौत हिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण पंजाबमधील शीख संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. अमृतसरमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून (एसजीपीसी) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. अमृतसरमधील पीव्हीआर सिनेमागृहाबाहेर शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागण्यांदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘इमर्जन्सी’ चित्रपटात शीख धर्म आणि 1984 चा इतिहास विकृत करण्यात आल्याचे एसजीपीसीच्या एका सदस्याने सांगितले. याआधी जेव्हा त्याचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सरकारने त्याबद्दल काहीही केले नाही. ते थांबवण्याऐवजी, सेन्सॉर बोर्डाने त्याला हिरवा कंदील दिला आणि चित्रपटाचे प्रदर्शन वेळापत्रक पूर्ण झाले. मात्र, ‘एसजीपीसी’ने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर थिएटर मालकांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित केला नाही. पंजाबमधील 80 पीव्हीआर थिएटरनी चित्रपट प्रदर्शित केला नसल्याचे सांगण्यात आले.