सीमेला गुन्हेमुक्त करणे भारताची प्रतिबद्धता
सीमेवर कुंपण उभारण्याप्रकरणी विदेश मंत्रालयाचा बांगलादेशला इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशचे अंतरिम सरकार सीमेवर भारताकडून उभारण्यात येणाऱ्या तारांच्या कुंपणाला विरोध करत आहे. आता भारताने बांगलादेशाल इशारा दिला आहे. बांगलादेशसोबत सकारात्मक संबंध इच्छितो, बांगलादेशी सीमेला गुन्हेमुक्त सुनिश्चित करणे भारताची प्रतिबद्धता आहे. बांगलादेशबाबत भारताचा दृष्टीकोन सकारात्मक राहिला असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले आहे.
सीमेवरील पुंपणासंबंधी पूर्वी झालेल्या सर्व सहमतींच्या आधारावर बांगलादेश सहकार्यात्मक दृष्टीकोन अवलंबेल अशी आशा आहे. आम्ही आमची स्थिती स्पष्ट केली आहे. बांगलादेशच्या कार्यवाहक आणि उप-कार्यवाहक उच्चायुक्ताला पाचारण करत सीमेवर कुंपण उभारण्याविषयी स्वत:ची स्थिती स्पष्ट केली असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.
सीमेवर गुन्हेगारी कारवाया, तस्करी आणि मानवतस्करी रोखण्यासाठी प्रकाश व्यवस्था, तंत्रज्ञान उपकरणांची स्थापना आणि कुंपण उभारण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे. बांगलादेश या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सहकार्यात्मक दृष्टीकोन स्वीकारेल अशी अपेक्षा असल्याचे जायसवाल यांनी नमूद केले आहे.
सकारात्मक संबंधांची इच्छा
आमच्या विदेश सचिवांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखांसोबतच्या भेटीत भारत सकारात्मक संबंध इच्छित असल्याचे स्पष्ट केले होते. भारत-बांगलादेश संबंध दोन्ही देशांच्या लोकांसाठी चांगले रहावेत असे आम्ही इच्छितो. याचमुळे आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि तो कायम राहणार असल्याचे वक्तव्य विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी डिसेंबर महिन्यात बांगलादेशचा दौरा करत तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस तसेच विदेश सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांची भेट घेतली होती.
रशियन सैन्यात लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू
16 भारतीय बेपत्ता : विदेश मंत्रालयाने दिली माहिती
रशिया आणि युक्रेनदरम्यान जारी असलेले युद्ध अनेक भारतीयांसाठी जीवघेणे ठरले आहे. रशियाच्या सैन्यात सामील होत युक्रेनच्या विरोधात युद्ध लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 16 भारतीय बेपत्ता आहेत अशी माहिती विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. रशियाच्या सैन्यात 126 भारतीय सामील झाल्याचे समोर ओल. या 126 पैकी 96 जण भारतात परतले असून त्यांना रशियन सशस्त्र दलांकडून मुक्त करण्यात आले आहे. रशियाच्या सैन्यात अद्याप 16 भारतीय असून त्यातील 16 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.