महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिबेट-नेपाळला भूकंपाचा तीव्र धक्का

06:58 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

126 ठार, हजारो घरे पडली : भारतातही पडसाद

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

तिबेट आणि नेपाळच्या सीमारेषेवर प्रचंड भूकंप झाला आहे. 7.1 एक रिश्टर प्रमाणातल्या या भूकंपात किमान 126 जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे कोसळली आहेत. कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यांखाली अनेक लोक अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळच्या वेळेला हा धक्का बसला, त्यानंतर काहीवेळ छोटे धक्के बसत राहिले, अशी माहिती चिनी वृत्तसंस्थेने दिली आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी झालेल्या विनाशकारी भूकंपाचे पडसाद भारताच्या उत्तर भागातही उमटले आहेत. भारतात लक्षणीय हानी झालेली नसली तरी काही तिबेटला लागून असलेल्या भारताच्या  भागात या भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमध्ये भूमीखाली आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असावा, असे प्राथमिक अनुमान आहे. जगभरातील भूकंपमापन यंत्रणांवर भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दुपारीही या भागात भूकंपाचा धक्का बसला होता, पण तो सौम्य होता.

हजारो घरे कोसळली

या भूकंपात हजारो घरे कोसळली असून स्थावर मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. या भागात जनसंख्या तुरळक असल्याने जीवितहानी तुलनेने कमी असली तरी भूकंपाची तीव्रता पाहता मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. तिबेट-नेपाळ सीमरेषेवरील डिंगरी भागात या भूकंपाचा परिणाम सर्वात अधिक जाणवला, तसेच हानीही सर्वाधिक झाली, अशी माहिती देण्यात आली.

जिनपिंग यांची प्रतिक्रिया

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी या भूकंपामुळे झालेल्या हानीसंबंधी तीव्र दु:ख प्रकट केले आहे. चिनी प्रशासन त्वरेने कामाला लागले असून लोकांचे जीव वाचविण्याच्या कार्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे. साहाय्यताकार्य युद्धपातळीवर केले जात असून आपण स्वत: त्यावर लक्ष ठेवत आहोत. आपदापिडितांचे पुनर्वसन लवकरच केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाठोपाठ तीन धक्के

सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी पहिला धक्का बसल्यानंतर सकाळीच आणखी दोन धक्के बसल्याने साहाय्यता कार्यात अडथळा निर्माण झाला. या तीन धक्क्यांमुळे हानीमध्ये आणखी भर पडली. त्यानंतर लहान-लहान धक्केही बरेच जाणवले. तिबेटमधला हा गेल्या कित्येक वर्षांमधील सर्वात मोठा भूकंप आहे.

मुख्य हानी तिबेटमध्ये

या भूकंपाचा मुख्य परिणाम तिबेटमध्ये झाला आहे. त्याखालोखाल हानी नेपाळमध्ये झाली असून भारतात बिहार आणि उत्तर भारतातील आणखी काही भागांमध्येही काही प्रमाणात धक्के जाणवले आहेत. नेपाळमधील खुंबू हिमनदी परिसरात काही प्रमाणात हानी झाली आहे. हा भाग एव्हरेस्ट शिखरावर जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या मुख्य छावणीच्या जवळ आहे. मात्र, छावणीची कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली. नेपाळ हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात असल्याने तेथे कोणत्याही क्षणी भूकंप होऊ शकतो अशी स्थिती आहे.

नेपाळमधील दुसरा मोठा भूकंप

नेपाळमधला हा गेल्या 10 वर्षांमधील दुसरा मोठा भूकंप आहे. 25 एप्रिल 2015 या दिवशी नेपाळला 7.8 रिश्टर प्रमाणाचा मोठा धक्का बसला होता. त्या भूकंपात किमान 9 हजार लोकांना प्राण गमवावे लागले होते. तो भूकंप नेपाळच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात हानीकारक मानला जातो. त्यात या देशातील 10 लाख इमारतींना धोका पोहचला होता. 1934 मध्येही नेपाळमध्ये असाच मोठा भूकंप झाला होता, ज्यात 8 हजार लोकांचा बळी गेला होता. तिबेटमध्येही अशा प्रकारचे तीन भूकंप गेल्या 100 वर्षांमध्ये झाले आहेत.

आपत्कालीन साहाय्यता वेगाने

ड तिबेटमधील भूकंपाची तीव्रता मोठी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

ड चीनच्या प्रशासनाकडून आपत्कालीन साहाय्यतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

ड सर्वाधिक हानी तिबेटच्या डिंगरी भागात, नेपाळलाही बसला मोठा फटका

ड उत्तर भारत, विशेषत: बिहारमध्ये या भूकंपाचे पडसाद पण हानी मर्यादित

Advertisement
Next Article