For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा जोरदार पलटवार, 3 बाद 231 धावा

06:58 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा जोरदार पलटवार  3 बाद 231 धावा
Advertisement

रोहित, विराट, सरफराजची अर्धशतके :  125 धावांनी पिछाडीवर :  न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 402 धावा, रवींद्रचे शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरा दिवस किवी संघाने गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुनरागमन करत जोरदार पलटवार केला. पहिल्या डावात भारताचा 46 धावांत खुर्दा उडवल्यानंतर न्यूझीलंडने 402 धावांचा डोंगर उभा करत 356 धावांची आघाडी घेतली. यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र रोहित शर्मा, विराट कोहली व सरफराज खान यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 49 षटकांत 3 गडी गमावत 231 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 125 धावांनी पिछाडीवर असून आज सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. दिवसअखेरीस सरफराज खान 70 धावांवर नाबाद राहिला.

Advertisement

तिसऱ्या दिवशी किवी संघाने 3 बाद 180 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डावातील चौथ्याच षटकात सिराजने डॅरिल मिचेलला 18 धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. यानंतर टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलीप्स व मॅट हेन्री लागोपाठ बाद झाल्याने किवी संघाची 7 बाद 233 अशी स्थिती झाली होती. पण, रचिन रवींद्र व टीम साऊदी यांनी संघाचा डाव सावरला.

रवींद्रचे शतक, साऊदीची आक्रमक खेळी

रवींद्र व साऊदीने खेळपट्टीवर ठाण मांडताना आठव्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 350 च्या पुढे नेली. रवींद्रने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावताना 157 चेंडूत 13 चौकार व 4 षटकारासह 134 धावा फटकावल्या. भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करताना त्याने फटकेबाजी केली. दुसरीकडे, साऊदीने आक्रमक खेळताना 73 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 65 धावांचे योगदान दिले. साऊदीचा अडथळा सिराजने दूर केला तर रवींद्रला कुलदीप यादवने बाद केले. रवींद्र बाद झाल्यानंतर किवीज संघाचा पहिला डाव 91.3 षटकांत 402 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. सिराजने 2 तर बुमराह व अश्विनने एक गडी बाद केला.

रोहितचा अर्धशतकी धमाका

पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या डावात मात्र टीम इंडियाने शानदार कमबॅक केले. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक सुरुवात करताना 72 धावांची भागीदारी केली. डावाच्या 18 व्या षटकात एजाज पटेलने यशस्वी जैस्वालला 35 धावांवर बाद केले. पहिल्या डावात फक्त दोन धावा करणारा रोहित यावेळी चांगल्या लयीत होता. रोहितने दमदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. रोहित अजून मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते पण त्यावेळीच तो एजाज पटेलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. रोहितने यावेळी 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या.

विराट-सरफराजचीही शानदार अर्धशतके

रोहित बाद झाल्यानंतर विराट व सरफराज यांची जोडी मैदानावर चांगलीच जमली. या जोडीने टी-20 स्टाईल फटकेबाजी करताना तिसऱ्या गड्यासाठी 136 धावांची पार्टनरशीप करत संघाला दोनशेपार नेले. सर्फराजने मैदानात आल्यावर लगेचच वादळी फटकेबाजीला सुरुवात केली. विराट कोहली त्यावेळी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यानंतर विराटदेखील सर्फराजच्या आक्रमणात सामील झाला. या दोघानींही टी-20 स्टाईल फटकेबाजी केली आणि भारताची धावगती वाढवली. पण तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर विराट बाद झाला. विराटने यावेळी 8 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 70 धावांची खेळी साकारली. कोहली बाद झाला असला तरी सरफराज अजूनही मैदानात कायम आहे. सरफराजने यावेळी 78 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 46 व दुसरा डाव 49 षटकांत 3 बाद 231 (जैस्वाल 35, रोहित 52, विराट 70, सरफराज खेळत आहे 70, एजाज पटेल 2 तर ग्लेन फिलिप्स 2 बळी).

न्यूझीलंड पहिला डाव 91.3 षटकांत सर्वबाद 402 (कॉनवे 91, रचिन रवींद्र 134, साऊदी 65, विल यंग 33, कुलदीप व जडेजा प्रत्येकी तीन बळी, सिराज 2 बळी).

विराट कोहली नऊ हजारी मनसबदार

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने अर्धशतकी खेळीसह आपल्या कारकिर्दीत आणखी एक माईलस्टोन पूर्ण केला आहे. विराटने कसोटीमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 116 कसोटी सामन्यांच्या 197 डावात 9000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो आता भारताचा केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याबात सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षांत भारताच्या एकाही खेळाडूला 9 हजार धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. त्यानंतर भारताच्या एकाही खेळाडूला 9 हजार धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. पण विराटने मात्र हे काम करून दाखवले आहे.

भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर - 15,921

राहुल द्रविड - 13,265

सुनील गावसकर - 10,122

विराट कोहली - 9017

गलती से मिस्टेक, रोहित विचित्र पद्धतीने क्लीन बोल्ड

बेंगळूर कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकी खेळी साकारली. मात्र, यानंतर तो विचित्र पद्धतीने बाद झाला. एका चुकीमुळे रोहितने त्याची विकेट गमावली. वास्तविक, डावातील 22 व्या षटकातील पाचव्या चेंडूचा रोहितने चांगला बचाव केला होता. पण चेंडू बॅटला लागला आणि मागे जाऊन स्टंपवर आदळला. यामुळे चांगल्या लयीत असलेल्या रोहितला तंबूत परतावे लागले. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने त्याची विकेट काढली.

किवीज फलंदाजाचे 12 वर्षानंतर भारतात शतक

रचिन रवींद्रने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत शतक झळकावले आणि न्यूझीलंडसाठी इतिहास घडवण्यात यशस्वी ठरला. गेल्या दशकभरात भारतात एकाही न्यूझीलंडच्या खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही, पण रवींद्रने संघाच्या शतकांचा भारतातील दुष्काळ संपवला आहे. रॉस टेलरनंतर तब्बल 12 वर्षांनंतर रचिन रवींद्रने भारतात शतक झळकावण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतात शेवटचे शतक 2012 मध्ये केले होते. रॉस टेलरने 2012 मध्ये बेंगळूरमध्ये 113 धावांची खेळी खेळली होती. तब्बल 12 वर्षांनंतर रवींद्रनेही याच मैदानावर शतक झळकावले आहे.

Advertisement
Tags :

.