जोरदार बॅटिंग, आणखी चार दिवस मुक्काम
पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड : घरांवर झाडे पडल्याने मोठी नुकसानी
पणजी : पावसाची जोरदार बॅटिंग चालूच राहिली आहे. गेल्या 24 तासात नोंदवलेला पाऊस हा सरासरी चार इंच एवढा होता. दाबोळीमध्ये सर्वाधिक साडेपाच इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज देखील ऑरेंज अलर्ट जारी केले असून जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सध्याचा मान्सूनपूर्व पाऊस हा आणखी चार दिवस गोव्यात मुक्कामासाठी आहे. गेल्या गेल्या 24 तासात पावसाने आपला जोर कायम ठेवला असून सर्वत्र मुसळधार पडलेल्या या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये दाबोळीमध्ये साडेपाच इंच, मुरगाव पाच इंच, धारबांदोडा पाच इंच, केपेत चार इंच, म्हापसा व वाळपई चार इंच, पणजी पावणे चार इंच, जुने गोवे साडेतीन इंच, काणकोण तीन इंच, पेडणे आणि सांगे येथे प्रत्येकी अडीच इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे दोन इंच पाऊस पडला. मान्सूनपूर्व पावसाचा एवढा आक्रमकपणा गेल्या कित्येक वर्षात प्रथमच पहावयास मिळाला. मान्सूनपूर्व पाऊस आतापर्यंत 12 इंच नोंदविला गेला हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 731 टक्के अधिक पडलेला आहे. दरवर्षी सरासरी या दरम्यान दीड इंच पावसाची नोंद होत असते. दरम्यान आजही हवामान खात्याने नारंगी अलर्ट गोव्यासाठी जारी केलेला आहे. शिवाय 24 पासून 28 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केले आहे.
चक्रीवादळाचा गोव्याला धोका नाही
दरम्यान अरबी समुद्रात गोवा व कोंकण दरम्यान 500 किलोमीटर आतमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे आज शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. हवामान खात्याच्या माहितीनुसार हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तो उत्तरेच्या दिशेने सरकत राहणार आहे. त्यामुळे गोव्याला त्याचा फारसा धोका नाही, परंतु यामुळे गोव्यात आज व उद्या जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता जास्त आहे. चक्रीवादळाचा गोव्यावर भयानक परिणाम होईल, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर कुणीतीरी पाठविल्यामुळे अनेकांची धांदल झाली, मात्र हवामान खात्याने कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेने सरकत असल्याचे स्पष्ट केले.
सावईवेरेत झाड पडल्याने पती-पत्नी जखमी : वाघुर्मे, पाटणतळी येथेही पडझड
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे फोंडा तालुक्यात गुरुवारच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. सावईवेरे येथे घरावर वृक्ष कोसळून पती व पत्नी जखमी झाले. घराचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. वाघुर्मे येथे तीन कुटुंबे राहत असलेल्या संयुक्त घरांवर झाड कोसळले तर पाटणतळी बांदोडा येथे कारगाडीवर झाड कोसळण्याची घटना घडली. फोणचेभाट सावईवेरे येथे गुरुवारी सकाळी प्रमोद धर्मू नाईक यांच्या घरावर आंबाड्याचे मोठे झाड पडल्याने छप्परासह इतर सामानाची नुकसानी झाली. छप्पराचा काही भाग अंगावर पडल्याने प्रमोद नाईक व त्यांची पत्नी प्रतिक्षा नाईक या जखमी झाल्या. त्यांच्यावर बेतकी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच क्रिकेट स्पर्धेसाठी गेलेले स्थानिक युवक घटनास्थळी धावून आले. फोंडा अग्नीशामक दलाच्या सहकार्याने घरावरील झाड हटवून छप्पराची दुरुस्ती करण्यात आली. वेरे वाघुर्मे पंचायतीचे तलाठी प्रीतेश नाईक यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
याच पंचायत क्षेत्रातील कावंगाळ येथे देवानंद नाईक, विष्णुदास नाईक व गुरुदास नाईक यांच्या संयुक्त घरांवर झाड कोसळल्याने साधारण रु. 1 लाख 70 हजारांची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत छप्पर व घरातील सामानांची बरीच नुकसानी झाली. यावेळी घरात कुणीच नसल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली. स्थानिक पंचसदस्य लोचन नाईक व सरपंच शोभा पेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशामक दलाच्या पथकासह स्थानिकांनी झाड हटविण्यास व घरातील सामान आवरण्यास मदतकार्य केले. पाटणतळी बांदोडा येथील नंदनवन हॉलजवळ घराशेजारी पार्क केलेल्या कारगाडीवर वृक्ष कोसळून साधारण रु. 50 हजारांची हानी झाली. प्रतिभा गावडे यांच्या मालकीची ही कारगाडी असून फोंडा अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन वाहनावरील झाड हटविले. सक्रे शिरोडा येथे घरावर झाड पडल्याची आणखी एक घटना फोंडा अग्निशामक केंद्रात नोंद झाली आहे. तसेच साकोर्डा येथे घरावर वृक्ष कोसळला. याशिवाय दिवसभरात इतर काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मदतकार्यासाठी फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांची धावपळ सुऊ होती.