कित्तूर उत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटा
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : वीरराणी कित्तूर चन्नम्माजींचा 200 वा विजयोत्सव कार्यक्रम असलेल्या कित्तूर उत्सवाच्या यशस्वितेसाठी अधिकारी व सर्व समित्यांच्या सदस्यांनी झटावे, असे आवाहन कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. बैलहोंगल प्रांताधिकारी कार्यालयात कित्तूर उत्सव-2024 च्या पार्श्वभूमीवर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले, यंदाचा उत्सव 200 वा विजयोत्सव असल्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अधिकारी व समित्यांच्या सदस्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. कोणत्याही उणिवा राहू नयेत, याची काळजी घ्यावी.
तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. उत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांचे जेवणखाण व वाहतूक व्यवस्थेत कसल्याही प्रकारची त्रुटी होऊ नये, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही नीटनेटकेपणा असावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बैलहोंगलच्या प्रांताधिकारी प्रभावती फकिरपूर आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. उत्सवानिमित्त होणारी मिरवणूक, एअर-शो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती, ग्रामीण क्रीडामहोत्सव आदींविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली.