सुरक्षित अन् सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी प्रयत्न करा
जिल्हाधिकाऱ्यांची पोलीस, परिवहनसह सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना
बेळगाव : अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षितता उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. बेळगाव शहर व उपनगरात वाहतूक व्यवस्था उत्तमपणे व सुरळीतपणे चालविण्यासाठी सुरक्षिततेच्या आधारावर क्रियायोजनेची अंमलबजावणी करावी, या दिशेने सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवरील रस्ते सुरक्षितता समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम आदी विविध खात्यांनी सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था सुरू राहील यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना राबवाव्यात. जिल्ह्यात एकूण 22 ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था कार्यरत आहेत. शहरातील सात जंक्शनमध्ये उड्डाणपुलांची निर्मिती होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतूक समस्या दूर करण्यासाठी आवश्यक योजना मागवावी.
वाहतूक व्यवस्था हाताळण्यासंबंधी टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी. टेंडर घेणाऱ्या संस्थांना नियम व अटींचे पालन करण्यासंबंधी सूचना द्यावी. चार किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलांची निर्मिती होणार आहे. यासंबंधीची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. गुलबर्गा येथे अल्पावधी, मध्यावधी व दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. बेळगाव शहरातही रस्ते सुरक्षितता व वाहतूक सुरळीत करण्याच्या योजना सुरू करण्यात येणार आहेत. ट्रॅफिक सिग्नलवर दुचाकी, चारचाकी, बस व विविध प्रकारच्या वाहनांची माहिती वाचण्यासाठी एआय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आकडेवारी पुरविण्यासंबंधी बागलकोट जिल्ह्यातील सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे. याबरोबरच स्मार्ट सिटी योजनेतील कॅमेरे व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक विषयक माहिती संग्रहित करता येते, असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.