कदंब कर्मचाऱ्यांचा संप रद्द
सहा मागण्यांवर निघाला तोडगा : ऑक्टोबरमध्ये होणार पुन्हा बैठक
पणजी : कामगार आयुक्तांसोबत विविध मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने कदंब कर्मचाऱ्यांचा 6 सप्टेंबर पासूनचा नियोजित संप रद्द केला आहे, अशी माहिती आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली आहे. ‘माझी बस’ योजना कदंब महामंडळाच्या हिताची नसल्याने या योजनेस कदंब कर्मचायांनी विरोध केला आहे. एकूण सहा मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या, त्यातील पाच मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्याचे ठरविण्यात आले असेही ख्रिस्तोफर म्हणाले.
ख्रिस्तोफर यांच्या सोबत अॅड. राजू मंगेशकर, सुहास नाईक व कदंबचे कर्मचारी उपस्थित होते. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह भविष्य निर्वाह निधी, चालक, कंडक्टरना कायम करणे अशा मागण्यांसाठी कदंब कर्मचारी संघटनेने संपाची नोटीस दिली होती. चतुर्थीच्या पूर्वदिनी म्हणजेच 6 सप्टेंबरपासून चालक, कंडक्टरांसह कर्मचारी संपावर जाणार होते. आजच्या बैठकीत मागण्यांवर तोडगा काढण्यात यश आल्याने संप मागे घेण्यात आला आहे.
इतर विविध मागण्यांवर 15 ऑक्टोबर रोजी कामगार आयुक्तांसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी वगळता अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम 12 टक्यांवरून 10 टक्के करण्यात आली होती. ती पुन्हा 12 टक्के करण्याची मागणी मान्य झाली आहे. सध्या चालक व कंडक्टर मिळून 500 कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कामाला आहेत. त्यांना तात्पुरत्या कामगारांचा दर्जा देण्याचे मान्य झाले आहे. यामुळे आता त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांइतकेच वेतन मिळणार आहे. आणखी 50 डिझेलच्या बस खरेदी करण्यासोबतच इलेक्ट्रिक बसेसवर कदंबचेच चालक असणे आवश्यक आहे, अशीही मागणी आहे.