पर्यावरण रक्षणासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा!
मंत्री ईश्वर खंड्रे यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना
बेंगळूर : वाढत्या जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. बळ्ळारी येथे शुक्रवारी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते म्हणाले, कारखान्यांमधून येणारा रासायनिक कचरा आणि बहुमजली इमारतींमधून येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तलाव, जलाशये, नद्या आणि तळ्यांमध्ये जात आहे. हा चिंतेचा विषय आहे. यामुळे केवळ जलचरच नव्हे; तर लोक आणि जनावरे देखील मृत्युमुखी पडत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पिण्याचा पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांची नियमितपणे तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
‘वन टाईम युज’ प्लास्टिकचा वापर टाळा!
‘वन टाईम युज’ प्लास्टिकचे जमिनीमध्ये विघटन होत नाही, पाण्यात विरघळतही नाही. जाळल्यावर हवेत विषारी घटक पसरतात. अशा प्रकारचे प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांनी अशा प्लास्टिक उत्पादनांचा त्याग करावा, उत्सव व बाजारपेठांमध्ये जाताना कापडी पिशव्या घेऊन जावे, असे आवाहन मंत्री ईश्वर खंड्रे यांनी केले. वाहनांमध्ये वापरलेले ऑईल, ई-कचरा आणि वैद्यकीय कचरा यांची वैज्ञानिक पद्धतीने पाहिजे. कारण अशा प्रकारचा कचरा अत्यंत धोकादायक आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करावी तसेच अशा कचऱ्यावर नियंत्रण ठेवावे, असे ते म्हणाले.
तर संपूर्ण मानवजात नष्ट होईल
जर नैसर्गिक स्रोत नष्ट झाले तर संपूर्ण मानवजात नष्ट होईल. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपण आणि पुढील पिढी जगू शकेल, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. घराभोवतीचे वातावरण स्वच्छ ठेवले पाहिजे आणि घरासमोर झाडे लावली पाहिजे, हरित पट्टा वाढविण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे आवाहनही मंत्री ईश्वर खंड्रे यांनी केले. कार्यक्रमात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र स्वामी, खासदार ई. तुकाराम व इतर मान्यवर उपस्थित होते.