नोकरभरती घोटाळे रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार
संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन, अयोध्येतील राममंदिर देशासाठी अभिमानास्पद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘केंद्रात स्थिर आणि बळकट सरकार असणे हे सर्व दृष्टींना भारताच्या हिताचे आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये एका भक्कम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारताने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आर्थिक क्षेत्रात आज देश नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने अग्रेसर आहे. अयोध्येतील राममंदिर हे भारतासाठी अभिमानास्पद असून देशाच्या वाढत्या आत्मविश्वासाचे ते प्रतीक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेसमोर केलेल्या अभिभाषणात केले आहे. देशभरात नोकरभरती करताना होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे, अशी घोषणाही राष्ट्रपती मुर्मू यांनी केली. अभिभाषणासाठी राष्ट्रपती मुर्मू संसद भवनात आल्यानंतर त्यांचे स्वागत ‘सेंगोल’सह करण्यात आले. अशा प्र कारे अभिभाषणासंबंधी एका नव्या परंपरेचा पायंडा बुधवारी घालण्यात आला आहे. याची बरीच चर्चा होत आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारी प्रारंभ करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे या अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्याने तो अंतरिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्थैर्य, प्रगतीवर भर
केंद्रात स्थिर सरकार असल्याने काही महत्वाचे निर्णय धाडसाने घेणे शक्य झाले. या निर्णयांचा देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी लाभ झाला. गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये जी भव्य कामगिरी केली ती देशाचा आत्मविश्वास दर्शविणारी आहे. घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करणे आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाची संमती मिळणे, तसेच अयोध्येत भगवान रामलल्लांचे भव्य मंदिर निर्माण होणे, दोन घटना असामान्य अशा आहेत, अयोध्येतील राममंदिर हा दशकोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचा हुंकार आहे. आज या अपेक्षेची पूर्ती झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.
भारताचे जागतिक महत्व
गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचे जागतिक महत्व पूर्वी कधी नव्हते तेव्हढे वाढले आहे. आज जगात अनेक संघर्ष होत आहेत. पण भारताने या संघर्षांमध्ये न पडता ‘विश्व मित्रा’ची भूमिका यशस्वीरित्या साकारली. सर्व वाद सामोपचाराने मिटविण्यावर भर दिला. भारताच्या या भूमिकेची प्रशंसा जगभर झाली. भारताने दक्षिण गोलार्धातील देशांचा आवाज जगभर उठविला. भारताच्या या धोरणाचे कौतुक झाले. आज भारताकडे जग आशेने पहात आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
अर्थव्यवस्था बळकट
10 वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था जगातील पाच सर्वात नाजूक अर्थव्यवस्थांपैकी एक होती. आज ती जगातील प्रथम पाच भक्कम अर्थव्यवस्थांच्यापैकी एक झाली आहे. हे परिवर्तन ऐतिहासिक आहे. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा साहसाने लागू केल्याने हे शक्य झाले. देशाचे करसंकलन विक्रमी पातळीवर पोहचले आहे. आज देशात प्रतिवर्ष 1,60,000 स्टार्ट अप कंपन्या नोंद होत आहेत. 10 वर्षांपूर्वी ही संख्या केवळ काही हजारांमध्ये होती. वस्तू आणि सेवा कर देणाऱ्या उद्योगांची संख्या, जी 2017 मध्ये 98 लाख होती. ती आज 1.40 कोटीवर पोहचली आहे. वाहनेही या दहा वर्षांमध्ये 13 कोटींवरुन 21 कोटींवर झाल्याची आकडेवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी स्पष्ट केली. आर्थिक प्रगतीची फळे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. याचा जनतेला लाभ होत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. महागाई दरावर नियंत्रण
काही दशकांपूर्वी भारताचा महागाई तर दुहेरी आकड्यांमध्ये होता. आता तो प्रतिवर्ष 4 टक्क्यांच्या आसपास असतो. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
जय श्रीरामच्या घोषणा
राष्ट्रपती मुर्मू यांनी अयोध्येतील राममंदिराचा उल्लेख त्यांच्या भाषणात करताच ‘जय श्रीराम’ या घोषणेने सारे संसद सभागृह दणाणून गेल्याचे दिसून आले. काही काळापर्यंत या घोषणेचा प्रतिसाद सभागृहात उमटत राहिला. अयोध्येतील भव्य राममंदिर सशक्त भारताचा पाया आहे, असे उद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले.
सोनिया गांधींनीही वाजवले बाक
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात बाक वाजविताना दिसून आल्या. त्यांच्या भाषणातील काही वाक्ये त्यांनाही आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्टपणे समजत होते. विरोधी पक्षांनी सर्व भाषण शांततेत ऐकले. कोणताही गोंधळ झाल्याचे दिसले नाही.
अधिवेशनाचा प्रारंभ
राष्ट्रपतींच्या अभिभाषणासह संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास आम्ही सज्ज आहोत. मात्र, विरोधी पक्षांनी कामकाज बंद पाडण्यापेक्षा ते चालविण्यात रस दाखविला पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
असे झाले राष्ट्रपतींचे अभिभाषण...
ड लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीतील हे भाषण 90 मिनिटांचे
ड अयोध्येतील राममंदिराचे निर्माण कार्य या सरकारची ऐतिहासिक उपलब्धी
ड केंद्रात भक्कम आणि स्थिर सरकार असल्यानेच देशाचा झपाट्याने विकास
ड घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ झाल्याने जम्मू-काश्मीरची वेगवान प्रगती
ड महिलांसाठी संसद-विधानसभांमध्ये आरक्षण दिल्याने समानतेची पायाभरणी
ड बळकट सरकारच्या धाडसी सुधारणांमुळे देशाचा जोमदार आर्थिक विकास
ड भारताच्या समतोल परराष्ट्र व्यवहार धोरणाची आज जगात सर्वत्र प्रशंसा