खासगी बंदर विरोधात अंकोला येथे कडकडीत बंद
कारवार : अंकोला तालुक्यातील भावीकेरी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील केणी येथील प्रस्तावित खासगी वाणिज्य बंदराच्या विरोधात मंगळवारी अंकोला येथे कडकडीत बंद आणि काळादिन पाळण्यात आला. केणी बंदर विरोध संघर्ष समितीने बंदची हाक दिली होती. बंदमुळे अंकोला नगरातील जनजीवन ठप्प झाले होते. काळादिन आणि बंदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या निषेध फेरीमध्ये शंभरहून अधिक खेड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. बंदमध्ये केवळ अंकोला तालुक्यातीलच नव्हेतर कारवार, कुमठा, होन्नावर तालुक्यातील मच्छीमार बांधवही सहभागी झाले होते. कारण नियोजित खासगी वाणिज्य बंदराचा सर्वात मोठा फटका मच्छीमार समाजाला बसणार आहे.
केणी येथे वाणिज्य बंदर उभारण्याच्या हालचालींना वर्षापूर्वीच सुरुवात झाली आहे. मच्छीमार समाजाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल ठरणाऱ्या बंदराच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून आंदोलन छेडले जात आहे. तथापि, सरकार मागे हटायला तयार नाही. मच्छीमार समाजाने आणि स्थानिकांनी हा प्रकल्प नकोच म्हणून कितीही ओरडून सांगितले तरी सरकारने त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पक्षभेद विसरून नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बंदमुळे अंकोला शहरातील दुकाने, हॉटेल्स, ऑटो आणि टेम्पो वाहतुकीसह सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. यावेळी आंदोलकांनी आमच्या भूमीवर समुद्रावर आमचाच हक्क असे सरकारला ठासून सांगण्याच्या प्रयत्न केला.
महिला आंदोलक आघाडीवर
आंदोलनावेळी उपस्थितांनी सरकार आणि नियोजित बंदराच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. यामध्ये महिला आंदोलन आघाडीवर होत्या. संतप्त आंदोलकांनी यावेळी खासगी बंदराची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री वैद्य यांच्यावर आरोपांचा भडिमार
आंदोलनकर्त्यांनी कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार सतीश सैल, विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर यांना आंदोलनस्थळी येण्याचे आवाहन केले. आंदोलनावेळी मंत्री मंकाळू वैद्य यांच्यावर आरोपांचा भडिमार करण्यात आला. मंकाळू वैद्य यांनी बेंगळूर दरबारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खासगी बंदराला होणाऱ्या विरोधाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनावेळी खबरदारीचा उपाय म्हणून अंकोला नगरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.