शहरासह उपनगरात कडेकोट बंदोबस्त
पोलीस आयुक्तांची माहिती : नशेबाजांवर करणार कडक कारवाई
बेळगाव : नवरात्र, दसरा व दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रविवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगावात 166 ठिकाणी दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सोमवार दि. 22 पासून दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे. पहाटे 5.30 ते सकाळी 9 पर्यंत होणाऱ्या दौडमध्ये हजारो नागरिक सहभागी होतात. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दुर्गामाता दौडमध्ये स्त्राr, पुरुष व लहान मुले, युवकही भाग घेतात. शहर व उपनगरात 166 ठिकाणी श्री दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. रोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत 169 ठिकाणी दांडियाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
दांडिया आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. दांडियाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवरात्र व दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या वेळी अमलीपदार्थांचे सेवन करणारे, मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील 1300 पोलीस, अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 300 जवान, राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या, 12 शक्ती वाहने, 15 होयसळ वाहने, हायवे पेट्रोलिंगची 9 वाहने 24 तास तत्पर असणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार असून समाजमाध्यमांवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. अन्य धर्मियांच्या भावनांना धक्का पोहोचविणाऱ्या व प्रक्षोभक मजकूर पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.