For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटकांना, स्थानिकांना त्रास दिल्यास होणार कडक कारवाई

06:49 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पर्यटकांना  स्थानिकांना त्रास दिल्यास होणार कडक कारवाई
Advertisement

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व दले सज्ज श्वान पथके, ड्रग्ज डिटेक्शनसह ड्रोनचाही वापर

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात देशविदेशी पर्यटक आलेले आहेत. किनारी भागात किंवा इतर ठिकाणी पर्यटकांना किंवा स्थानिकांना नाहक त्रास करत असल्याचे समोर आल्यास त्वरित कारवाई केली जाईल, अशी माहिती  एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Advertisement

पर्यटनस्थळे तसेच किनारी भागात पर्यटकांना विविध आमिषे दाखवून लुटण्याचे प्रकार चालू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी दलालांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तसेच सराईत गुन्हेगार आणि भाडेकरूंची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पर्यटकांनी कायद्याचे भान ठेवून मौजमजा करावी. कायदा व सुव्यवस्था बिगडण्याच प्रकार आढळल्यास सबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

ड्रग्ज सेवन होऊ नये

राज्यात अंमलीपदार्थांची विक्री किंवा सेवन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी गोवा पोलिसासह अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (एएनसी) विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी अमलीपदार्थ पथक तीन श्वान पथकासह ड्रग्स डिटेक्शन किटचा वापर करणार आहे.

तीन हजार कर्मचारी तैनात

गोवा पोलिस, अग्निशामक दल तसेच राज्यातील इतर विभागातील मिळून सुमारे 3 हजारहून जास्त अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांसह 9 श्वान पथकांसह ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अमलीपदार्थ तस्करांवर नजर ठेवण्यासाठी तीन श्वानांचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील किनारी परिसरासह रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठ तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी केली जाणार आहे.

वाहतूक विभागाची विशेष तयारी

वाहतूक विभागानेही विशेष मोहीम हाती घेतली असून मद्यपी चालकांवर पोलिसांची खास नजर राहील. चोख बंदोबस्तासाठी पोलिसांनी आयआरबी व इतर विभागाच्या पोलिसांच्या मदतीने पूर्ण जबाबदारी हाती घेतली आहे. त्यासाठी चार आयआरबी प्लॅटूनसह इतर कर्मचारी मिळून सुमारे दोन हजार पोसिल व इतर विभागातील कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त अग्निशामक दलाचे कर्मचारी, तर 108 जीव्हीके इएमआरआय ऊग्णवाहिकेचे कर्मचारी व इतर आपत्कालीन यंत्रणेचे 500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक पोलिस आणि गृहरक्षक तैनात केले आहे. गोवा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब निकामी पथक (बीडीएस), जलद कृती दलाचे पोलिस, वाहतूक विभागाचे पोलिस तसेच विशेष विभागाचे पोलिस व इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

ध्वनीप्रदूषणाची होणार चाचणी

ध्वनी प्रदूषण नियमाची चाचणी करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (जीएसपीसीबी) ठिकठिकाणी रिअल-टाइम ध्वनी निरीक्षण प्रणाली उभारण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायदंडाधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून किनारी परिसरात ‘नो पार्किंग’ घोषित केले आहे. याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत खासगी प्रवाशी बस वगळता इतर अवजड वाहनांना किनारी परिसरात विविध ठिकाणी ‘नो एंट्री’ सह एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

Advertisement

.