नाताळात नाठाळांच्या माथी एएनसीची काठी!
पेडणे, बार्देशमध्ये छापेमारी, अनेक संशयित ताब्यात : सनबर्नमध्ये ड्रग्ज सेवनप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पणजी : नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एएनसीची टीम कार्यरत झाली असून विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 9.2 लाखांचा चरस जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका स्थानिकासह नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पणजीत पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अमलीपदार्थविरोधी विभागाचे अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी ही माहिती दिली. त्यावेळी डीवायएसपी नेर्लन आल्बुकर्क, निरीक्षक साजिथ पिल्लई यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सरत्या वर्षाची अखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांची सुरक्षा तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. एएनसी पथकाने मंगळवारी तुये-पेडणे व साळगाव येथे ड्रग्जविरोधी कारवाई केली. त्यात 9.2 लाखांचा चरस जप्त करण्यात आला आहे. सध्या दोन दिवसांपासून दि. 28 पासून धारगळ येथे सनबर्न फेस्टिव्हल देखील सुरू झाला आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांचा कडक पहारा आहे, असे वर्मा म्हणाले.
‘सनबर्न’मध्ये ड्रग्ज, पाच जणांवर गुन्हा
सनबर्न कार्यक्रमाच्या आवारात अमलीपदार्थ सेवन केल्याचे आढळून आल्याने पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. यात 4 जणांनी गांजा तर एकाने कोकेन हे अमलीपदार्थ सेवन केले होते, असे वर्मा यांनी सांगितले.
गांजा तस्करीचा म्होरक्या जाळ्यात
आंतरराज्य गांजा तस्करीत गांजा पुरवठा नेटवर्कचा म्होरक्या गुड्डू मोची राम याला पलामू, झारखंड येथून अटक करण्यात एएनसीला यश आले आहे. यापूर्वी एएनसीने झारखंडचेच दोन आणि अस्नोडा येथील एक मिळून तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 13 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांना हा गांजा पुरवणाऱ्या म्होरक्याच्या मागावर पोलीस होते. पीएसआय गिरीश पाडलोस्कर यांच्या नेतृत्वाखाली पीसीएस योगेश मडगावकर आणि आतिश शेटकर यांच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. सध्या त्याला पकडण्यात आले असून तो पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत आहे. याकामी पलामू पोलिसांनी सहकार्य केले, असे वर्मा यांनी सांगितले.
दिल्लीतील गुन्हेगारास कोलव्यात अटक
अन्य कारवाईत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला हवा असलेल्या पोर्तुगीज नागरिकास पकडण्यात एएनसी आणि गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मदत केली. त्याला कोलवा येथून ताब्यात घेण्यात आले. दिल्लीत झालेल्या एका गुह्यात तो सामील होता व त्याच्याकडून तब्बल 2.5 कोटीचे 3.5 किलो चरस जप्त करण्यात आला होता. कोलवा येथून सोनु कुमार चौहान (24 वर्षे, उत्तर प्रदेश) याला स्थानिक पोलिसांनी अटक कऊन 2 लाखापेक्षा अधिक किमतीचा अमलीपदार्थ जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी गोव्याकडे येणारा 2 कोटी ऊपयांचा चरस जप्त कऊन तिघांना गजाआड केले होते. त्यामुळे गोव्यात नववर्ष निमित्ताने अमलीपदार्थ येणार अशी संभावना व्यक्त करण्यात आल्यामुळे एएनसी विभाग सतर्क झाला आहे. गोव्यात सातत्याने अमलीपदार्थ सापडत असून बाहेऊन येणाऱ्यांकडे ते मिळत असल्याचे समोर आले आहे.
‘दिसताक्षणीच’ तक्रार करा
अमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. त्यासाठी गोवा पोलिसांच्या 112 किंवा अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या ‘मानस’ 1933 या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वर्मा यांनी केले.