कुख्यात जर्मनी गँगविरोधी मोक्काचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे
गुंड आंनदा जाधव उर्फ जर्मनीसह सुमारे 16 संशयितच्या नावाचा समावेश; एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
राजेंद्र होळकर इचलकरंजी
शहरातील कुख्यात जर्मनी गँगविरोधी कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कडक पाऊले उचलले असून, लवकरच या गँगविरोधी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचा इचलकरंजीचे पोलीस उपाअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी प्रस्ताव तयार केला असून, हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी नुकताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये गँगचा म्होरक्या आणि नामचिन गुंड आंनद्या उर्फ आंनदा जाधव उर्फ जर्मनीसह सुमारे 16 साथिदारांच्या नावाचा समावेश असून, एक साथिदार अद्यापी पसार आहे.
जर्मनी गँगने शहर आणि परिसरातील उद्योजक, व्यापारी यांच्यामध्ये मोठी दशहत निर्माण केली आहे. या गँगची संपूर्ण सुत्रे गुंड आद्या उर्फ आदर्श जाधव उर्फ जर्मनी, गुंड आनंद्या उर्फ आनंदा जाधव उर्फ जर्मनी, गुन्हेगार अविनाश जाधव उर्फ जर्मनी हे तिघे जर्मनी बंधू हालवित आहेत. या तिघाविरोधी जिह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाची गुन्हे नोंद आहेत. या गँगच्या गुन्हेगारी कारनाम्याची दखल घेऊन जिह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी गांभीर्याने दखल घेऊन गँगविरोधी मोकान्वये कारवाई केली होती. त्यामुळे या गँगच्या तिघा जर्मनी बंधूसह सुमारे 30 साथिदार कारागृहाची हवा खात होते. काही महिन्यापूर्वी गुंड आनंद्या, गुन्हेगार अविनाश जाधवसह त्याचे काही साथिदार जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. तर अद्यापी गुंड आद्या जर्मनी कारागृहाची हवा खात आहे. कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या गुंड आनंद्या उर्फ आनंदा जाधव उर्फ जर्मनीने काही साथिदारांच्या मदतीने पुन्हा शहरात गुन्हेगारी कारनामे सुऊ केले.
याचदरम्यान या गँगने शहापूर, गैबान रेसिडेन्सी येथील रिअल इस्टेट व्यावसायिक सरदार मुजावर यांचे चार चाकी गाडीतून अपहरण केले. गाडीतून फिरवत त्यांना बेदम मारहाण कऊन, त्यांच्याकडील 18 तोळे सोन्याचे दागिने आणि चार लाखांची रोकड असा 11 लाख 35 हजार ऊपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेवून पोबारा केला. या विषयी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, शहापूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी गँगचा म्होरक्या आणि गुंड आनंद्या जर्मनीसह 15 जणांना अटक केली. तर व्हाईट कॉलर गुन्हेगार एमएम उर्फ महेश माळी (रा. इचलकरंजी) हा अद्यापी पसार आहे. या घडल्या प्रकाराची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस उपाअधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस उपाअधीक्षक समीरसिंह साळवे आदींनी गांभीर्याने दखल घेतली. या गँगची शहर आणि परिसरातील दशहत मोडीत काढण्याचा चंग बांधला. यापूर्वी या गँगविरोधी मोकान्वये करण्यात आलेल्या कारवाई वेळी चुकून राहिलेल्या बारकाव्याचा अभ्यास कऊन, पुन्हा मोकान्वये कारवाई करण्याचा निर्णय घेऊन, या गँगविरोधी नुकताच नव्याने मोका कारवाईचा पोलीस उपाअधीक्षक साळवे यांनी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे तीन दिवसापूर्वी पाठविला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.