For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिनोळीत सीमावासियांनी दाखविली ताकद

10:39 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
शिनोळीत सीमावासियांनी दाखविली ताकद
Advertisement

तीन तास रास्तारोको : वाहनांच्या लांबच लांब रांगा : कर्नाटकी पोलिसांची दादागिरी

Advertisement

बेळगाव : महामेळाव्याला परवानगी नाकारल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर रास्तारोको करून आपली ताकद दाखवून दिली. बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्ग तब्बल तीन तास रोखण्यात आला. कर्नाटकासह महाराष्ट्र सरकारलाही सीमावासियांची आठवण व्हावी, यासाठी तीन तास उन्हामध्ये सीमावासियांनी रास्तारोको केला. महामार्ग रोखल्याने दोन्ही राज्यांच्या सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून बेळगावमध्ये सुरू झाले. याला विरोध म्हणून मराठी भाषिकांच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन केले जाते. परंतु, महामेळाव्याच्या केवळ एक दिवस अगोदर पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने म. ए. समितीने महाराष्ट्राच्या हद्दीतील शिनोळी येथे आंदोलन करण्याचे निश्चित केले. त्यानुसार सकाळपासून शिनोळी येथे शेकडो सीमावासीय दाखल झाले होते. भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांमुळे शिनोळी परिसर भगवामय झाला होता.

हुतात्मा स्मारकाला अभिवादन

Advertisement

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ या घोषणांनी हिंडलगा परिसर दणाणून सोडला. हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता मराठी भाषिक शिनोळीच्या दिशेने रवाना झाले. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ये-जा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटो काढले जात होते. शिनोळी येथील रास्ता रोकोमध्ये सीमावासीय सहभागी होऊ नयेत, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू होता.

व्हॅक्सिन डेपो परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप

महामेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर म. ए. समितीने शिनोळी येथे रास्ता रोको करणार असल्याचे जाहीर केले. परंतु, रविवारी सायंकाळपासूनच व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही कारणाने व्हॅक्सिन डेपो परिसरात मराठी भाषिकांनी आंदोलन केल्यास याचे पडसाद राज्यभर उमटतील, याचा अंदाज पोलिसांना आल्यामुळे व्हॅक्सिन डेपोकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनाची धार कमी व्हावी यासाठी सोमवारी पहाटे 5.30 वाजल्यापासून म. ए. समितीच्या प्रमुख नेत्यांच्या घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले. नेत्यांवर नजर ठेवण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता. काही नेत्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाबही विचारला. केवळ तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही कर्नाटकात रास्ता रोको न करता महाराष्ट्रात करणार असल्याने पोलिसांना माघारी बोलवून घ्या, अशा सूचनाही नेत्यांनी केल्या. त्यामुळे शिनोळीत होणारा रास्ता रोकोही चिरडण्याचा प्रयत्न पहाटेपासूनच सुरू होता.

आजवर केवळ चुरमुऱ्यांचीच मेजवानी

1956 पासून आजवर केवळ चुरमुऱ्यांच्या मेजवानीवर आमदारकीच्या निवडणुका जिंकणाऱ्या म. ए. समितीने आपला मराठी बाणा सोमवारी झालेल्या रास्ता रोको वेळीही दाखवून दिला. राष्ट्रीय पक्ष व संघटनांना कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यासाठी चमचमीत जेवणाची मेजवानी द्यावी लागते. परंतु, म. ए. समितीने मूठभर दिलेल्या चुरमुऱ्यांवर आंदोलने यशस्वी होऊ शकतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

चंदगड-कोकणची बससेवा कोलमडली

मराठी भाषिकांनी बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्ग रोखल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती. याचा परिणाम इतर वाहतुकीसोबत बससेवेवरही झाला. चंदगड तसेच कोकणातून येणाऱ्या बस शिनोळी येथे थांबविण्यात आल्या होत्या. येथील काही बस शिनोळी-सुरुते मार्गे बेळगावला सोडण्यात आल्या. परंतु, बेळगावहून चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या बस मात्र वाहतूक कोंडीत अडकल्या. यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले.

येळ्ळूर म. ए. समितीचा मराठी बाणा

सीमाप्रश्नाच्या लढ्यात नेहमीच अग्रणी असणाऱ्या येळ्ळूर गावातील नागरिकांनी सोमवारच्या रास्ता रोकोमध्ये सहभाग नोंदविला. ‘ऊठ महाराष्ट्रा जागा हो, सीमाप्रश्नाचा धागा हो’ असे वाक्य लिहिलेला ‘महाराष्ट्र राज्य’ फलक असलेला फोटो झळकविल्याने हा फलक चर्चेचा विषय ठरला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले. प्रकाश अष्टेकर, दुदाप्पा बागेवाडी, शिवाजी पाटील, कृष्णा शहापूरकर, राजू पावले, सूरज गोरल, यल्लुप्पा पाटील, अनंत घाडी, प्रकाश मालुचे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट

सकाळी 11 वाजल्यापासून बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता अडविल्याने अनेक वाहने तब्बल दोन ते तीन तास अडकली होती. परंतु, सामाजिक भान जपलेल्या म. ए. समितीने चंदगडहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. आमच्या न्याय्य हक्काचा प्रश्न असला तरी कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही, याची खबरदारी म. ए. समितीने आंदोलनादरम्यान घेतली.

जयंत पाटील यांनी फोनवरून साधला संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोनवरून शिनोळी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी पक्ष सुरुवातीपासून सीमावासियांच्या पाठीशी आहे. शरद पवार यांनी अनेकवेळा हा प्रश्न लोकसभेपर्यंत पोहचविला आहे. कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारणे ही निंदनीय गोष्ट असून याचा जाब महाराष्ट्र सरकारने विचारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.