कॅन्टोन्मेंट हद्दीतील पथदीप दुरुस्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील क्लब रोड, स्टेशन रोड, रामघाट रोड, तसेच कॅम्प परिसरातील पथदीप दुरुस्त करण्याची मोहीम कॅन्टोन्मेंट बोर्डने हाती घेतली आहे. यामुळे ज्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून अंधार होता, त्या भागामध्ये आता पथदीप सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मध्यंतरी निधी नसल्यामुळे पथदीप दुरुस्तीचे काम रखडले होते. पथदीप बसविण्यासाठीचे दिवे, तसेच इतर इलेक्ट्रिक साहित्य उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. परंतु सध्या निधी उपलब्ध होत असल्याने टप्प्याटप्प्याने दुरुस्ती केली जात आहे. त्यातच बेळगावमध्ये कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होणार असल्याने क्लब रोड येथील पथदीप पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणचे पथदीप दुरुस्त करण्यात आले आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करणे सोयीचे होत आहे. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार यांच्या प्रयत्नातून दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.