कामगारांच्या शासकीय योजना सुरळीत करा
जिल्हा कामगार संघटनेची कामगार खात्याकडे मागणी
बेळगाव : असंघटित कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा बंद झाल्या आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, विवाह, घरबांधणी आदींसाठी मिळणारा निधी तातडीने देण्यात यावा, यासाठी जिल्हा कामगार संघटनेतर्फे कामगार खात्याला निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 96 इतकी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे. शासनाकडून कामगारांना विविध सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. मात्र या सुविधांची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांना वंचित रहावे लागत आहे. कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती मागील दोन वर्षांपासून बंद झाली आहे. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.
घर बांधकामाची आर्थिक रक्क्मही थांबली
त्याबरोबर कामगारांना घर बांधण्यासाठी मिळणारी आर्थिक रक्कम थांबली आहे. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्या कामगारांच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच उरली आहे. यावेळी जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, रमेश काकतीकर, पिराजी कंग्राळकर, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना 5 लाखांची मदत
अपघातात मृत्यू झालेल्या येळ्ळूर आणि मास्तमर्डी येथील दोघांना 5 लाखांची आर्थिक मदत मिळाली आहे. या कामगारांच्या कुटुंबीयांकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार कार्डाचा लाभ मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना झाला आहे.
लग्नासाठी 85 जणांना मदत
कामगारांच्या मुलांना विवाहासाठी 60 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. 85 कामगारांच्या मुलांना ही मदत मंजूर झाली आहे. लवकरच या लाभार्थ्यांना ही मदत देऊ केली जाणार आहे.