आजपासून भटक्या कुत्र्यांना देणार लस
महानगरपालिका, पशूसंगोपन खात्याची संयुक्त मोहीम : रेबिज दिनानिमित्त रविवारपासून प्रारंभ
बेळगाव : महानगरपालिका आणि पशूसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रेबिज दिन पशूसंगोपन खात्याच्या आवारात असलेल्या रयत भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी 50 हून अधिक भटक्या कुत्र्यांना अँटी रेबिज लस टोचण्यात आली. जवळपास महिनाभर विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांना लस टोचली जाणार असून सोमवार दि. 28 पासून लसीकरणाला गती देण्यात येणार आहे. यंदा जागतिक रेबिज दिनानिमित्त ‘क्रियाशिल व्हा, मी, तुम्ही आणि समाज’ अशी थीम देण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरांत महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 10 ते 12 हजार भटकी कुत्री आहेत. दरवर्षी कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यंदा चालू वर्षातील 6 महिन्यांत कुत्र्याने चावा घेतलेल्या 5 जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. सरकारकडून भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुत्र्यांसाठी फिड पाईंट निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
पण जीवघेण्या रेबिजबाबत अद्यापही नागरिकांमध्ये म्हणावी तशी जागृती झाली नसल्याने दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबिज दिनानिमित्त जनजागृती करण्यासह कुत्र्यांना लस टोचली जात होती. पण यंदा भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना लस टोचली जाणार आहे. जवळपास महिनाभर महानगरपालिकेचे कर्मचारी कुत्र्यांना पकडणार असून पशूवैद्यकीय अधिकारी त्या कुत्र्यांना लस टोचणार आहेत. रविवारी प्राणी दया संघाचे सदस्य, स्वयंसेवक आणि प्राणीप्रेमींना महानगरपालिकेकडून ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शंकरगौडा पाटील होते. यावेळी पशूसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. रवि सालिगौडर यांनी आपले विचार मांडले. महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंता अशोक सज्जन यांनी स्वागत केले. मुख्य अतिथी म्हणून मनपा आयुक्त शुभा बी., जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद, मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, जिल्हा प्राणी दया संघ बेळगावचे सचिव राजेंद्र जैन, नगरसेवक गिरीश धोंगडी उपस्थित होते. जागतिक रेबिज दिनानिमित्त रेबिजबाबत जागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत भाग घेतलेल्या पशूसखींना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात आले. यावेळी तालुका पशूवैद्याधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी आभार मानले.