शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणार
सरकारकडून मार्गसूची जारी : दिशानिर्देशांचे पालन करण्याची राज्यातील शैक्षणिक संस्थांना सूचना
बेंगळूर : राज्यात भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वाढल्या आहेत. भटक्या कुत्र्यांनी महिला, लहान मुलांचा चावा घेतल्याच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मार्गसूची जारी केली आहे. सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा व शिक्षण संस्थांनी या मार्गसूचीचे पालन करावे, असा आदेश देण्यात आला आहे. बेंगळूरसह राज्यभरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: भटक्या कुत्र्यांकडून मुले आणि महिलांवर होणारे हल्ले वाढले आहेत. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासही घाबरत आहेत. भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी राज्यांनी उचललेल्या पावलांचा अहवाल मागितला होता. याबाबत माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयान कर्नाटक सरकारला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या आरोग्य खात्याने भटक्या श्वानदंशावर तातडीने उपचार देण्यासाठी पावले उचलली आहेत.
आरोग्य खात्याकडून कोणत्या उपाययोजना?
आरोग्य खात्याने सर्वत्र प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये श्वानदंशावरील लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोफत आणि त्वरित उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुत्र्यांच्या नसबंदीसह नियंत्रण उपाययोजनांबाबत न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची सूचना दिली आहे. प्राणीप्रेमी आणि स्थानिक खात्यांशी समन्वय साधून उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश आरोग्य खात्याने दिले आहेत.
काय आहे मार्गसूचीमध्ये?
- सर्व शैक्षणिक संस्थांनी शाळेच्या परिसरातील कुत्र्यांच्या संख्येची माहिती शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावी.
- शैक्षणिक संस्थांनी भटक्या कुत्र्यांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करावे.
- शैक्षणिक संस्थांमधून कुत्र्यांना स्थलांतरित केल्यानंतर,भटक्या कुत्र्यांचा पुन्हा शाळेच्या आवारात प्रवेश होऊ नये यासाठी कम्पाऊंड निर्माण करावे.
- भटक्या कुत्र्यांचे स्थलांतर, संख्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेशी समन्वय साधण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा.