For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा वावर

11:11 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा वावर
Advertisement

नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न : बंदोबस्त करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच कुत्र्यांचा धुडगूस सुरू असतो. यामुळे नागरिकांना ये-जा करणेही अवघड होत आहे. भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर जात असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. स्वामी विवेकानंद मार्ग येथे बेळगाव तहसीलदार कार्यालय आहे. महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये कार्यालय चालवले जात असल्याने या ठिकाणी अनेक समस्या आहेत.  गळक्या छतामुळे अनेकवेळा कार्यालयात पाणी येत असते.

या समस्या सुरू असतानाच आता भटक्या कुत्र्यांमुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. संध्याकाळनंतर कार्यालयात कोणी नसल्याने भटकी कुत्री याच ठिकाणी आसरा घेत आहेत. कार्यालयात येणारे काहीजण या कुत्र्यांना बिस्किटे तसेच इतर खाद्यपदार्थ टाकत असल्यामुळे कुत्र्यांचा या परिसरातच वावर आहे. तहसीलदार कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. रेशनकार्ड, महसुलासंदर्भातील नोंदी, जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार, पेन्शन यासह इतर कामांसाठी नागरिक कार्यालयात येत असतात. परंतु, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कुत्री ठाण मांडून बसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

Advertisement

...तर नागरिकांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न 

कार्यालयात जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असल्याने कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेळगाव वन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही या कुत्र्यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने महानगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व येथील अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.