For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मच्छे-पिरनवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर

11:23 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
मच्छे पिरनवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर
Advertisement

नागरिकांवर हल्ले होण्याच्या प्रकारात वाढ : बंदोबस्त करण्याची संबंधितांकडे मागणी 

Advertisement

वार्ताहर/किणये 

मच्छे-पिरनवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा अधिक वावर वाढलेला आहे. या कुत्र्यांनी अक्षरश: या भागात हैदोस घातला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील सदर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मच्छे मुख्य रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये, बसथांब्याजवळ या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे महिला, वयोवृद्ध व विद्यार्थी वर्ग भयभीत होत आहेत. पिरनवाडी येथील सिद्धेश्वर गल्लीच्या कोपऱ्यावरील बसथांब्याजवळ, दर्ग्याजवळील बसथांब्याच्या शेजारी, उर्दू शाळेजवळ व मुख्य रस्त्यावर नेहमीच कुत्र्यांचे कळप थांबलेले असतात. याचा त्रास विद्यार्थी, महिला वर्गांना अधिक प्रमाणात होत आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Advertisement

दुचाकीस्वारावरही हल्ले

दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांवर ही भटकी कुत्री धावून जातात. त्यामुळे बरेच दुचाकीस्वार दुचाकीवरून पडलेले आहेत. त्यांना किरकोळ दुखापतही झालेली आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली. मच्छे व पिरनवाडी या दोन्ही गावांचा विस्तार वाढलेला आहे. बाजाराला आलेल्या महिलांना या भटक्या कुत्र्यांचा नियमित सामना करावा लागत आहे. कारण हातात पिशवी धरून जात असलेल्या महिलांवर कुत्री हल्ले करत आहेत. मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याभोवती कुत्र्यांचे कळप

मच्छे व पिरनवाडी या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. या कचऱ्याच्या ठिकाणी चिकण व मटन दुकानातील टाकाऊ पदार्थ आणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे या कचऱ्याच्या आजूबाजूलाही कुत्र्यांची कळप नेहमीच ठाण मांडून असतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीत्या लावण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी पिरनवाडी येथील एक महिला कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावली. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी या त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या परिसरात पाहणी करून या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Advertisement
Tags :

.