शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच
कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत : कुत्र्यांची गणती करणार : बंदोबस्ताची मागणी
बेळगाव : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शहराबरोबरच उपनगरातही वाढला आहे. यामुळे लहान मुलांसह नागरिकांना धोका निर्माण झाला असून, कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. हिरेबागेवाडी येथे कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात येणार असले तरीही सध्या निर्बीजीकरण मोहीम बंद आहे. त्यामुळे कुत्र्यांची पैदास झपाट्याने वाढत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. परिणामी घराबाहेर खेळणाऱ्या व शाळेला जाणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याची वेळ पालकांवर आली आहे. तितकेच नव्हे तर सकाळच्या वेळी फिरावयास जाणाऱ्यांवरही कुत्र्यांच्या कळपाकडून हल्ला करून चावा घेतला जात आहे. शहर व उपनगरात मटण व चिकन दुकानातील उरलेले मांस पदार्थ कुत्र्यांना टाकले जात आहे. तर काही महिला व नागरिक कुत्र्यांना कच्चे मांस पदार्थ खाऊ घालत आहेत. त्याना खाऊ न मिळाल्यास कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
काही दिवसांपासून कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम बंद
महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे 19 हजार भटकी कुत्री आहेत. त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम जून 2022 पासून सुरू झाली आहे. श्रीनगर येथील महापालिकेच्या गो-शाळेतही निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात होती. पण काही कारणास्तव काही दिवसांपासून कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची गणती व अँटीरेबीज लसीकरण खर्च निश्चित करण्यासाठी मनपाने सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. कन्सल्टंट कंपनी नियुक्त झाल्यास या दोन्ही मोहिमांचा खर्च निश्चित होणार असून, त्यानंतर मोहिमेसाठी ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. शहरात कुत्र्यांसाठी तीन ठिकाणी शेल्टर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी येथील शेल्टरचे काम पूर्ण करा
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 लाख लोकसंख्येच्या मागे कुत्र्यांसाठी 1 शेल्टर असणे जरुरीचे आहे. पण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे, हेच मनपाला माहीत नाही. त्यामुळेच कुत्र्यांची गणती केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर भटक्या कुत्र्यांसाठी फिडींग झोन सुरू करण्यासाठी जागेची पाहणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होणार असल्याने तातडीने हिरेबागेवाडी येथील शेल्टरचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.