शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना चावा
सातारा :
आरोग्य विभागाकडून कुत्रे पकडण्यासाठी एक संस्था नेमली होती. ती संस्था आणि आरोग्य विभागाची कुत्रे पकडण्याची मोहिम दिवाळीच्या महिन्यात चांगलीच गाजली होती. मात्र, तेव्हा तापलेले वातावरण शांत करता करता आरोग्य विभाग मेटाकुटीला आला होता. सध्या गोडोली, विलासपूर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरु झालेला असून दोन दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्यांकडून तीन चार जणांना चावा घेतल्याची जोरदार चर्चा या परिसरात आहे. पालिकेकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरात भटकी जनावरे वाढलेली दिसतात. गायी, बैल हे रस्त्यात मोकाट फिरताना दिसतात. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचीही संख्या आटोक्यात आलेली नाही. त्या भटक्या कुत्र्यांनी आणि बैलांनी दिवाळीच्या महिन्यामध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाला जेरीस आणले होते. त्यावेळी आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ठेवलेल्या संस्थेचा पर्दाफाशही झाला होता. संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचेही ठरले होते. तेवढ्यापुरते या संस्थेने काम केले. परंतु येरे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा ही संस्था कुठे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अलिकडेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये गोडोली, विलासपूर भागात रात्री भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी एक कुत्रे असेच तेथील स्थानिकांना चावले आहे. त्याच कुत्र्याने तीन ते चार जणांना चावा घेतल्याची या परिसरात चर्चा असून पालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
कुत्रे चावल्याने इंजेक्शन घेतले
परवा रात्री बाहेर गावावरुन आलो होतो. चालत घरी जात असताना पाठीमागून एक कुत्रे आले आणि माझ्या पायाला त्याने धरले. मी त्या कुत्र्याच्या हल्यामुळे भयभित झालो. कशीबशी त्या कुत्र्यापासून सुटका केली. परंतु मला त्याने चावल्याने इंजेक्शन घ्यावी लागली. आताच इंजेक्शन घेवून आलो आहे.
जी. तानाजी, विलासपूर
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिकेने करावा
सातारा पालिकेने आमच्या गोडोली भागात वाढलेली भटकी कुत्री धरुन न्यावीत आणि त्यांची तिकडे कुठेतरी सोय लावावी. कॉलनीत भटकी कुत्री वाढल्याने लहान मुलांना बाहेर फिरता येत नाही.
बाळासाहेब देसाई,वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष