For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाला सर्व सहकार्य

03:30 PM Jan 19, 2025 IST | Radhika Patil
जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाला सर्व सहकार्य
Advertisement

सातारा : 

Advertisement

सातारा जिह्याला भाजपाने दोन मंत्री दिलेले आहेत. महायुतीचे चार मंत्री जिह्यात आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडून चांगल्या अपेक्षा आहेत. जिह्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगले काम करुयात. प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, भाजपाचे नेते विक्रम पावस्कर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, रामकृष्ण वेताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्वामित्व योजना ही आजपासून सुरु होत आहे. ही एक महत्वकांक्षी आणि नाविन्यपूर्ण योजना आहे. अधिकृत डाक्युमेंट स्वामित्व योजनेच्या माध्यमातून जागा मालकाकडे राहणार आहे. भूमापन विभागाकडून ड्रोनच्या माध्यमातून जिह्यातील 550 गावांची मोजणी झाली आहे. 500 गावांची मोजणी मे पर्यत पूर्ण होईल. त्यापुढच्या टप्प्यात शहरी भागातील काम केले जाणार आहे. पूर्वी गावागावात जागेच्या हद्दीवरुन वाद होत होते. आता हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वादाला पूर्णविराम मिळणार आहे. हे प्रमाणपत्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवले गेले आहे. त्यामुळे रेकॉर्ड राहणार आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या जागेचे अधिकार ठेवण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले आहे. डिजिटल डाक्युमेंट कायदेशीर वैध असून त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

  • जिह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार

मंत्री शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, जिह्याच्या विकासाच्या दृष्टीने नवीन काहीतरी चांगलं झाले पाहिजे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. राज्य सरकारच्यावतीने राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. सातारा जिह्यात कोणीही उगाच विरोधासाठी विरोध होत करत नाही. चांगल्या उपक्रमांना सातारकरांचा 100 टक्के पाठींबा असतो. साताऱ्याला महायुतीचे चार मंत्री आहेत. दोन भाजपाचे आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ग्रामविकास मंत्री ही दोन्ही खाती मोठी आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात काम करावे लागणार आहे. लोकांच्या अपेक्षा प्रशासनाकडून वाढलेल्या आहेत. आपण चांगलं काहीतरी करू, जिह्यात अनेक गडकिल्ले आहेत. त्यांचे संवर्धनासाठी काम केले पाहिजे. जिह्यातील धरणाचा अनुशेष भरून काढला पाहिजे. एमआयडीसी वाढली पाहिजे. आज मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला गेलेले आहेत. तेथे काही कंपन्यांचा करार होईल. त्याचा वाटा आपल्या जिह्यात मिळाला पाहिजे. जिह्यात औद्योगिकरण आणि पर्यटन वाढीला फायदा झाला पाहिजे, असेही त्यांनी मत व्यक्त केले.

  • ब्रिटीश काळानंतर प्रथमच सर्व्हेक्षण

जिल्हाधिकारी संतोष पाटील हे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग यांच्यावतीने प्रॉपर्टी कार्डचे वितरण पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होत आहे. भारत हा खेड्यांचा देश होता. आताही खेड्यांनाच प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात 30 हजार ग्रामपंचायती आहेत. तेथे रहात असलेल्या ग्रामस्थांना मालकी हकाचा पुरावा देण्याची स्वामित्व योजना आहे. ही योजना पुणे जिह्यातील सासवड तालुक्यातील गाव सोनेरी या गावात पहिल्यांदा सुरु करण्यात आली. आजपासून ते देशात लागू झाली आहे. जिह्यातील 400 गावांचा सिटी सर्व्हे झालेला आहे. 502 गावात मोजणीचे काम झालेले आहे. मालमत्ता पत्रक वाटप होत आहे. ब्रिटीशकाळात जमिनीचा सर्व्हे केला होता. त्यानंतर आता होत आहे. पिढ्यान्पिढ्या हा सर्व्हे झालेला नव्हता. आता सर्व्हे झाल्यानंतर इकडे सर, तिकडे सर हे होणार नाही. डिजिटल मोजणी करुन मालमत्ता कोणाची आहे हे समजणार आहे, असे त्यांनी सांगितले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आस्थेवाईकपणे विचारणा

देशभरातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला, राज्यस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रातील नागपूर येथील लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी स्वामित्व योजनेचा नेमका तुम्हाला फायदा कसा झाला. तुम्ही या योजनेच्या माध्यमातून काय करणार आहात, तुमच्या घरी कोण कोण आहे. तुम्ही काय करता, असे प्रश्न त्यांनी लाभार्थ्यांना विचारले आणि या योजनेची माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.