भटक्या कुत्र्याचा वाढदिवस
जगात श्वानप्रेमींची संख्या पुष्कळ आहे. अनेकांना महाग श्वान खरेदी करणे, त्यांना पाळणे, त्या पाळण्यासाठी बराच पैसा खर्च करणे याची मोठीच हौस असते. अशा श्वानांचा अगदी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ हे श्वानप्रेमी करतात. महागडे आणि जातीवंत श्वान हे जणू त्यांच्या प्रतिष्ठेचे चिन्ह असते. तथापि, जे श्वान भटके असतात आणि रस्त्यांवरच जन्माला येतात, वाढतात त्यांचा मात्र तिरस्कार केला जातो. त्यांना दगड मारले जातात. श्वान या प्रजातीशी माणसाचे संबंध असे दोन टोकांमध्ये विभागले गेले आहेत. तथापि, अपवादात्मक श्वानप्रेमी असे असतात की, जे स्वत:च्या घरात कुत्रे पाळत नाहीत, पण भटक्या कुत्र्यांच्या योगक्षेमाची त्यांना चिंता असते. त्याना खाऊ घालणे आणि त्यांचे भरणपोषण करणे हा त्यांचा छंद असतो. अशीही ही एक लोकप्रिय ठरलेली घटना आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ प्रदर्शित होत आहे. त्यात काही विद्यार्थी एका भटक्या श्वानाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या मित्रांचे किंवा भावाबहिणींचे वाढदिवस साजरे करतो, तशाच प्रकारे या भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा होत असताना या व्हिडीओत दिसून येतो. या अनोख्या वाढदिवसानिमित्त या विद्यार्थ्यांनी गाणीही लावली आणि नाचही केला. मिठाई वाटण्यात आली. ज्या कुत्र्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला तो कुत्राही त्यात समरस होऊन गेल्याचे दिसून येते. हा सर्व प्रकार आपल्यासाठी चालला आहे, याची त्याला जाणीव असावी, असे दिसून येते.
हा कार्यक्रम का आयोजित केला, याचे कारणही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एक संदेश द्यायची त्यांची इच्छा आहे. मुक्या जीवांनाही भावना असतात. आपल्याला कोणीतरी आपुलकी दाखवावी, असे त्यांनाही मनोमन वाटत असते. ते आपली ही इच्छा बोलून व्यक्त करु शकत नाहीत. पण असे कोणी केल्यास त्यांना किती आनंद होतो, हे त्यांच्या देहबोलीवरुन समजते. तेव्हा अशा जीवांना टाकावू न समजता आणि त्यांचा तिरस्कार न करता आपले काही आनंदाचे क्षण त्यांच्याशीही वाटून घ्यावेत, ही प्रेरणा लोकांना मिळावी, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.